Your Own Digital Platform

वाहनाच्या धडकेने बिबट्याचा बछडा ठार


ढेबेवाडी : एका वाहनाच्या धडकेने बिबट्याचा बछडा जागीच ठार झाल्याची घटना आज (साेमवार) पहाटे गुढे-काळगाव रस्त्यावर धामणी (ता.पाटण) गावाजवळ घडली.
 
वनविभागाचे आधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा व पुढील अन्य कार्यवाही सुरू आहे. काळगाव-धामणी परिसराच्या आजूबाजूला डोंगर व घनदाट झाडी असून वन्यप्राण्यांचा तेथे सतत वावर असतो.
 
अलीकडे तेथे बिबट्याचा संचारही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. धामणी गावाजवळ आज (साेमवार) पहाटे साडेपाचच्या सुमारास वाहनाच्या धडकेने बिबट्याचा बछडा जागीच ठार झाल्याची घटना घडली. दाट धुक्यामुळे कदाचीत अंदाज न आल्याने ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृत बछड्याचे वय अंदाजे सव्वावर्षं आहे. यावेळी त्याच्यासोबत त्याची आईसुद्धा होती. बछड्याच्या मृत्यूनंतर तिचा आरडाओरडा कानावर आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान ज्या वाहनाने बिबट्यास धडक दिली. ते काेणते हाेते हे मात्र समजू शकले नाही.