Your Own Digital Platform

युवकाच्या खून प्रकरणी सहा जणांवर गुन्हा


खुन्नस का देतोस कारणावरून ओगलेवाडीत प्रकार 

स्थैर्य, कराड : खुन्‍नस का देतोस? असे विचारल्याच्या कारणावरून चिडून जाऊन छातीवर चाकूने वार करत युवकाचा खून केला. याप्रकरणी सात जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हजारमाची (ता. कराड) येथे शनिवार दि. 25 रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी चार संशयितांना अटक करून न्यायालयात हजर केले असता 29 पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तर अन्य अल्पवयीन दोघांची रवानगी बाल सुधारगृहात केली आहे.

नरेंद्र अनिल कदम (वय 22, रा. हजारमाची, ता. कराड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर कुणाल सुभाष पळसे (वय 21), शुभम शैलेंद्र आंबेकरी (वय 19), सचिन कृष्णत पळसे (वय 42), सागर सदाशिव पळसे (वय 25. सर्व रा. हजारमाची, ता. कराड), अनोळखी एक तसेच अल्पवयीन दोघे अशा सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ऋषिकेश पिसाळ याने फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, नरेंद्र कदम हा मित्र ऋषिकेश पिसाळ यांच्यासह दुचाकीवरून कराडला जात असताना हजारमाची (ओगलेवाडी) पळसे वाडा येथे रस्त्यावर उभा असलेल्या एका अल्पवयीन मुलाजवळ त्यांनी दुचाकी थांबवली.
 
माझ्याकडे नेहमी का बघतोस असे नरेंद्र कदम म्हणत असतानाच तेथे इतर मुले जमा झाली. त्यांच्यापैकी काही जणांच्या हातात लाकडी दांडकी होती. त्यावेळी आमचे भांडण नाही आम्ही शांतपणे चर्चा करत असल्याचे ऋषिकेश पिसाळ यांने इतरांना सांगितले.
 
ऋषिकेश पिसाळ बोलत असतानाच कुणाल पळसे हातात दांडके घेऊन नरेंद्र कदम यास मारण्याकरता जात असल्याचे त्याला दिसले. त्यामुळे ऋषिकेश पिसाळ याने कुणाल पळसे याला अडवले. त्यावेळी कुणालने मारलेले दंडके ऋषिकेशच्या हातावर जोरात लागले. तर शुभम आंबेकरी, सचिन पळसे, सागर पळसे, व अनोळखी एकजण यातील काहींनी ऋषिकेशला पकडून ठेवले. कुणाल पळसे हा लाकडी दांडक्याने नरेंद्र कदम यास मारहाण करत असताना नरेंद्रने कुणालच्या हातातील दांडके हिसकावून घेत त्यालाच जोरात मारले. त्यामुळे कुणाल घराकडे पळत गेला तर इतर संशयितांनी नरेंद्र कदम यास मारहाण करण्यास सुरुवात केली.
घरी गेलेला कुणाल पळसे हातात चाकू घेऊन आला व त्याने तो चाकू नरेंद्र कदम याच्या छातीमध्ये जोरात खुपसला. त्यामुळे नरेंद्र जोरात ओरडत खाली कोसळल्याने संशयित तेथून पळून गेले. नरेंद्र कदमच्या छातीतून मोठ्या प्रमाणावर रक्त येत असल्याने ऋषिकेश पिसाळ यांच्यासह इतरांनी त्याला उपचारासाठी त्वरित कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, नरेंद्र कदम हा मयत झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. यावरून संशयित सात जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पोलिसांनी चार संशयितांना अटक करून त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता 29 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघा अल्पवयीनांची बाल सुधारगृहात रवानगी केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर करत आहेत.