आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यात्रेनिमित्त गावी


स्थैर्य, सातारा : दरे तर्फ तांब ता.महाबळेश्वर गावचे सुपुत्र महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे उत्तरेश्वर यात्रेनिमित्त गावी आले असून तीन दिवस ते गावी राहणार आहेत. पहिल्याच दिवशी त्यांनी आपले वडील संभाजी नवलू शिंदे यांचे समवेत जाऊन दरे तर्फ तांब या आपल्या गावालगत असणाऱ्या शेतीची पाहणी केली. त्या ठिकाणी बांधलेले मोठे शेततळे व त्यातील पाणी पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
 
शनिवारी कल्याणचे खासदार आणि मुलगा डॉ. श्रीकांत शिंदे व आपल्या संपूर्ण कुटुंबातील सदस्यांसोबत उत्तरेश्वर येथील यात्रेनिमित्त उत्तरेश्वर मंदिरात देवदर्शनासाठी जाणार आहेत. रविवारी दरे ग्रामस्थ व मुंबईकर मंडळी यांच्यावतीने मंत्री एकनाथ शिंदे यांचा गावचे ग्रामदैवत जननी देवी मंदिरात सत्कार करण्यात येणार आहे. मंत्री महोदय तीन दिवस गावी मुक्कामी आल्याने कोयना विभाग व संपूर्ण सातारा जिल्ह्यातून खूप मोठ्या प्रमाणावर लोक दरे गावी भेटायला येत असल्याने दरे तर्फ तांब गावाला यात्रेचे स्वरूप आले आहे.