Your Own Digital Platform

पान टपरी फोडणाऱ्या दोघांना अटकस्थैर्य, सातारा : येथील पोवई नाक्यावरील पानटपरी फोडून त्यामधील मोबाईलचे अ‍ॅक्सेसरीज चोरीस गेलेल्याचा छडा लावण्यात सातारा शहर पोलिसांना यश आले असून, याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

चंद्रकांत पांडुरंग बनसोडे उर्फ पप्पू (वय २०, रा. पवार कॉलनी शाहूपुरी सातारा), श्रीकांत शंकर पवार उर्फ सोन्या (वय २०, रा. पंताचा गोट,सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोवई नाक्यावरील हेम एजन्सीच्या पाठीमागे एक टपरी आहे. या टपरीमधील मोबाईलचे अ‍ॅक्सेसरीज व इतर साहित्य असे एकूण २६ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने काही दिवसांपूर्वी चोरून नेला होता. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली होती.
 
सातारा शहरातील चोरी घरफोडीतील गुन्हे उघडकीस आणण्यासंदर्भात पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपूते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी समीर शेख यांनी अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या होत्या. त्याप्रमाणे शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांना वरील दोघा संशयिताविरोधात खबऱ्यामार्फत गोपनीय माहिती मिळाली.
 
त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक एन. एम. कदम, हवालदार दत्ता पवार, हवालदार उदय जाधव, प्रवीण पवार यांची एक टीम तयार करण्यात आली. या टीमने चंद्रकांत आणि श्रीकांतला गुरूवारी सायंकाळी विविध ठिकाणाहून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीचा ऐवजही जप्त करण्यात आला आहे. पोलीस हवालदार उदय जाधव हे अधिक तपास करीत आहेत.