Your Own Digital Platform

कातरखटाव येथे शटर उचकटून बारा हजार लंपास

 चोरटयांनी उचकटलेले दुकानाचे शटर. ( छाया : समीर तांबोळी )स्थैर्य, कातरखटाव : येथील मिरज-भिगवण राज्य मार्गा लगत असलेल्या दुकानाचे शटर उचकटून चोरटयांनी बारा हजाराची रोकड व कागदपत्रे लंपास केल्याची घटना काल रात्री घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
या बाबत घटना स्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी : बनपुरी (ता.खटाव ) येथील सोमनाथ देवकर या युवकाने दोन महिन्यांपूर्वी कातरखटाव येथे एस. यु. देवकर एजन्सीज या नावाने पशुखाद्याचे दुकान सुरू केले आहे. नेहमीप्रमाणे रात्री आठ च्या सुमारास दुकान बंद करून ते आपल्या राहत्या घरी गेले होते.आज सकाळी नऊ वाजता ते दुकान उघडण्यासाठी आले असता शटर उचकटले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी त्वरित पोलिस पाटील घनशाम पोरे यांच्याशी संपर्क साधत घडलेल्या घटनेची माहिती दिली. देवकर व पोरे यांनी दुकानात जाऊन पाहणी केली असता बॅन्क पासबुक, चेकबुक , महत्त्वाची कागदपत्रे व रोख रक्कम बारा हजार रुपये असलेली बॅग तिथे नसल्याचे त्यांना आढळून आले . याबाबत त्यांनी वडूज पोलिस ठान्याशी संपर्क साधत तक्रार दाखल केली आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

दरम्यान, तीन दिवसापूर्वी एनकुळ येथील ग्रामदैवत भैरवनाथ तथा नाथबाबा मंदिरातील दानपेटी चे कुलूप तोडून त्यातील रोख रक्कम लंपास झाल्याची घटना घडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.