Your Own Digital Platform

जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या जुळ्या बहिणी

(डावीकडून) : रिद्धी व सिद्धी हात्तेकर


जागतिक स्तरावर प्राविण्य मिळविण्याचे लक्ष : रिद्धी व सिद्धी हात्तेकर

आसाम, गुवाहटी : औरंगाबादमधील रिद्धी व सिद्धी हात्तेकर या जुळ्या भगिनींनी आसाम, गुवाहटी येथे सुरु असलेल्या तिस-या खेलो इंडिया युथ क्रीडा स्पर्धेत जिम्नॅस्टिक्समध्ये लक्ष वेधून घेतले आहे. महाराष्ट्राच्या या खेळाडूंनी या क्रीडा प्रकारात आपल्या राज्यास आतापर्यंत अनेक पदकांची लयलूट करुन दिली आहे.

खरंतर या क्रीडाप्रकारात आपण करिअर करण्याची अपेक्षाही केली नव्हती, मात्र त्यांचा मोठा भाऊ प्रथमेश याचा या खेळातील सराव पाहताना त्यांनाही या खेळाची गोडी निर्माण झाली. प्रथमेशने अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेतल्यानंतर त्याने या खेळाचा सराव कमी केला. परंतु रिद्धी व सिद्धी यांनी वयाच्या सातव्या वर्षांपासूनच रामकृष्ण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या खेळाच्या सरावास प्रारंभ केला. प्रथमेशचा या खेळातील यशाचा वारसा त्या पुढे चालवित आहेत.

गेल्या आठ वर्षांमध्ये त्यांनी आंतरशालेय व खुल्या गटात जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर अगणित पदकांची लयलूट केली आहे. रिद्धी व सिद्धी या अजूनही या खेळात समर्थपणे करिअर करीत आहेत. या भगिंनीनी खेलो इंडिया महोत्सवातही महाराष्ट्राला आतापर्यंत घवघवीत यश मिळवून दिले आहे. त्या दोघीही औरंगाबादमधील शारदा मंदिर विद्यालयात शिकत असून पालकांकडून व शाळेकडूनही त्यांना भरपूर प्रोत्साहन मिळत आहे. सिद्धीने कनिष्ठ गटाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्वही केले आहे.

भारताची आॅलिंपिकपटू दीपा कर्माकर ही त्यांच्यासाठी प्रेरणास्थान असून तिच्यासारखे जागतिक स्तरावर या खेळात प्राविण्य मिळविण्याचे ध्येय आहे. खेलो इंडिया क्रीडा महोत्सव विविध खेळांमधील नैपुण्य शोधण्यासाठी व उदयोन्मुख खेळाडूंचा विकास करण्यासाठी स्तुत्य उपक्रम आहे. या उपक्रमातून अनेक आॅलिंपिकपटू घडणार आहेत. असे या भगिनींनी सांगितले.