आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क

अल्पवयीन मुले गुन्हेगारीच्या वाटेवर!


स्थैर्य, सातारा : सातारा पोलिसांनी जिह्यात गुह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी कारवाईचा धडाका लावला आहे. त्यातून पोलिसांनी घरफोडी, दरोडा, मारहाण, खूनाचा प्रयत्न, मोबाईल तसेच मोटारसायकल चोरी यांसह अन्य गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मात्र, पोलिसांकडून गुन्हे उघडकीस करत असताना गुन्हेगारांमध्ये अल्पवयीन मुलांचा आकडा वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलांची पावले गुन्हेगारीच्या वाटेवर असल्याने अशा गुह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस प्रशासनाबरोबरच पालकांनी मुलांचे समुपदेशन करणे गरजेचे ठरत आहे.सातारा पोलीस दलाच्या शहर, तालुका व शाहूपुरी पोलिस ठाण्यांतर्गत नोंद असलेल्या गुह्यांचे तपास स्थानिक गुन्हे शाखेने पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते व अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत. यामध्ये सातारा शहर पोलिसांनी मोटरसायकल व महागडय़ा रेंजर सायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला. त्यामध्ये एका संशयित अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आला होते. त्याच्याकडून तीन मोटारसायकली व पाच रेंजर सायकल हस्तगत करण्यात आल्या. तसेच शाहूपुरी पोलीस ठाण्यांतर्गत मोबाईल चोरीचा गुन्हा नोंद असलेल्या प्रकरणी तपास करत असताना एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन त्याच्याकडून तब्बल एक लाख पंधरा हजार रुपयांचे महागडे मोबाईल हस्तगत करण्यात आले. तर सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने कण्हेर (ता. जि. सातारा) येथील हॉटेलवर राडा केल्याप्रकरणी नोंद असलेल्या गुह्यात सात जणांना ताब्यात घेतले. त्यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश होता. यांच्याकडून चार दुचाकीसह हत्यारे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.गेल्या आठवडाभरात या तिन्ही पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुह्यांची उकल करत असताना पोलिसांना तीन गुह्यात चार अल्पवयीन मुले मिळून आली. चारही मुले अल्पवयीन असल्याने त्यांच्या पालकांसमक्ष त्यांची चौकशी करून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या सर्व बाजूंचा विचार केला असता अल्पवयीन वयातच मुले गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत चालली आहेत. आज समाजात स्वतःची ऐशोआराम आणि गरजा पूर्ण करण्यासाठी अल्पवयीन मुले व्यसनाधीनते बरोबरच गुन्हेगारी करू लागली आहेत. छोटय़ा-मोठय़ा चोऱया, किरकोळ कारणावरून भांडणे, मारामाऱया अशा गुह्यांमध्ये अल्पवयीन मुले पुढे असल्याचे दिसत आहे.सध्या धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनशैलीमुळे पालकांचे मुलांकडे दुर्लक्ष होत चालले आहे. त्यामुळे ही मुले कोणाचाही दबाव नसल्याने स्वतःची मौज-मजा पूर्ण करण्यासाठी चोरी करून मिळालेल्या पैशातून मौज करीत आहेत. अल्पवयीन मुले गुन्हेगारीच्या गर्तेत अडकत असल्यामुळे त्यांचे भविष्य अंधारात लोटत आहे. त्यांच्या लहान वयातील चुकांमुळे पुढे मोठय़ा परिणामांना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्याकडे भविष्यच नसल्याने ही मुले पैसे, मौजमजा तसेच व्यसनांसाठी सैरभैर झाल्याचे दिसत आहे.
 
त्यामुळे पोलीस प्रशासनाबरोबरच पालकांनीही आपला धाक ठेवल्यास अशा गुह्यांना नक्कीच प्रतिबंध बसेल.तिन्ही गुह्यात अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याने तपासात चौकशी करत असताना पोलिसांसमोर कायदेशीर मर्यादा येत होत्या. अत्यंत कुशलतेने व पालकांना विश्वासात घेवून गन्हा उघडकीस करताना पोलिसांनाही करत करावी लागली. गुह्यातील संशयितांना ताब्यात घेत असताना ते संशयित अल्पवयीन आहेत की नाहीत याची कल्पना पोलिसांना सुरवातीला नसल्याने त्यांना प्राथमिक चौकशी करुनच मुलांना कायद्याच्या चौकटीत बसवून कारवाई करणे गरजेचे आहे.