Your Own Digital Platform

सुरक्षित वाहतुकीचे नियम हे आपल्यासाठीच ;तरुणांनी पुढाकार घ्यावा -खासदार श्रीनिवास पाटीलस्थैर्य, सातारा : सुरक्षित वाहतुकीचे नियम हे आपल्यासाठीच आहेत हे ध्यानात ठेवून होणारे अपघात टाळण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे हे आपले कर्तव्य आहे. तरुणांनी सुरक्षित वाहतुकीच्या जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन साताऱ्याचे खासदार तसेच जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष श्रीनिवास पाटील यांनी आज केले.

सातारा व कराड उप प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि सातारा पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने 31 व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन खासदार श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सातारा येथील सैनिक स्कूलच्या डहाणूकर सभागृहात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, सातारच्या नगराध्यक्ष माधवी कदम, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, जिल्हा शल्यचिकीत्सक आमोद गडीकर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्टचे संचालक प्रकाश गवळी आदी उपस्थित होते.

प्रत्येक नागरिकांनी सुरक्षितपणे वाहन चालवावे, त्यांच्याकडून अपघात होऊ नये, वाहतुकीच्या नियमांची माहिती व्हावी यासाठी रस्ता सुरक्षा सप्ताहाद्वारे जनजागृतीचे आयोजन करण्यात करण्यात येत असल्याचे सांगून खासदार श्रीनिवास पाटील पुढे म्हणाले, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई होऊ नये, यासाठी काळजी घेण्यापेक्षा आपल्या घरी आपली काळजी करणारे कुंटूंब मागे आहे याचा विचार करुन वाहन चालवावे. अपघात हे जाणून बुजून होत नसतात, अपघात घडल्यांनतर इजा झालेल्या अपघातग्रस्तास आपले कर्तव्य समजून रुग्णालयांत नेऊन त्यांच्या उपराचासाठी दाखल करावे. यावेळी राबविण्यात आलेल्या ‘एम अकरा आता हॉर्न विसरा’ या अभियानाचे कौतूक देखील खासदार श्री. पाटील यांनी यावेळी केले.जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी अपघात होऊ नयेत यासाठी सुरक्षित वाहतूकीच्यादृष्टीने जिल्ह्यातील ब्लॅकस्पॉटस् लक्षात घेऊन त्यावर करण्यात येणा-या कायमस्वरुपी उपाय योजनांची माहिती दिली. वाहनाच्या वेग मर्यादेचे पालन न करणाऱ्या सर्व वाहनधारकांची इंटरसेप्टर वाहनातील स्पीडगन या उपकरणाद्वारे वेग मर्यादा मोजली जात असते. तेव्हा सर्वांनी वाहन सुरक्षित वेगमर्यादेत वाहन चालवून अपघात टाळावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती सिंघल यांनी केले.

रस्ता सुरक्षा सप्ताहाद्वारे रस्ता सुरक्षा व सुरक्षित वाहतूकीसाठी जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार असून या उपक्रमास सर्व नागरिकांनी साथ द्यावी, असे आवाहन आपल्या प्रास्ताविकात उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी व्यक्त केले.

यावेळी रस्ता सुरक्षेसाठी सर्वांना प्रतिज्ञा देण्यात आली. तसेच आपत्ती व्यवस्थापन तसेच परिवहन विभागातर्फे रस्ता सुरक्षा साहित्यांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रस्ता सुरक्षा अभियानात महत्वाचे योगदान देणाऱ्या मान्यवरांचे तसेच विना अपघात वाहतुकीसाठी एसटी चालकांचा, उत्कृष्ट महिला स्कुल बसचालकांचा तसेच अपघातांत मदत कार्यासाठी धावून जाणाऱ्या विविध ट्रेकर्स तसेच रेस्क्यु टीम्सचा सत्कार खासदार श्रीनिवास पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मोटार वाहन निरीक्षक आफ्रीन मुलाणी, तर आभार वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी मानले. कार्यक्रमास सर्व वाहतूक डिलर्स, पी.यु.सी.सेंटर्स व ड्रायव्हिंग स्कूल प्रतिनिधी, वाहतूकदार संघटनांचे प्रतिनिधी, पत्रकार तसेच महाविद्यालयांचे विद्यार्थी विद्यार्थींनी तसेच एनएसएस, व एनसीसीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.