Your Own Digital Platform

धकटवाडीच्या जवानाचा कर्तव्य बजावताना मृत्यूस्थैर्य, वडूज : सीमा सुरक्षा दलामध्ये कार्यरत असणारे धकटवाडी (ता.खटाव जि.सातारा) येथील ज्ञानेश्वर चंद्रकांत जाधव (वय 28) यांचा जम्मू-काश्मीरमध्ये सैन्य दलात कर्तव्य बजावत असताना मृत्यू झाला असल्याची माहिती सातारा जिल्हा सैनिक कल्याण बोर्ड यांच्याकडून देण्यात आली.
 
ज्ञानेश्वर चंद्रकांत जाधव 2015 साली 101 सीमा सुरक्षा दलात (बीएसफ) मध्ये दाखल झाले होते. दोनच वर्षांपूर्वी त्यांचे लग्न होऊन त्यांना दिड महिन्याचा मुलगा आहे. घरची परिस्थिती जेमतेम असून ज्ञानेश्वर यांचे 12 वी पर्यंतचे शिक्षण सिद्धेश्वर कुरोली (ता.खटाव) येथील कनिष्ठ महाविद्यालयात झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, दोन बहिणी, दिड महिन्याचा मुलगा असा परिवार आहे. गुरुवार दि. 9 रोजी सायंकाळी ज्ञानेश्वर जाधव यांचा कर्तव्य बजावताना मृत्यू झाला. याबाबतची माहिती जम्मू काश्मीर येथील वरिष्ठ अधिकार्‍यांनी दूरध्वनी द्वारे कुटूंबियांना दिली. हे वृत्त समजल्यानंतर जाधव कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. दरम्यान ज्ञानेश्वर जाधव यांचे पार्थिव शनिवार दि.11 रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत पुणे विमानतळ येथे येणार आहे. त्यानंतर धकटवाडी येथे आणण्यात येणार आहे.