Your Own Digital Platform

कण्हेर कालव्याला भगदाड शेतकरी पुन्हा संकटात

रब्बी हंगाम तोंडावर आला असतानाच कोडोली दत्तनगर येथे कण्हेरच्या उजव्या कालव्याला भगदाड पडल्याने शेतकर्‍यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

कालव्याच्या कामातील भ्रष्टाचारांची चौकशीची स्वाभिमानीच्या राजू शेळकेंची मागणी

स्थैर्य, सातारा : रब्बी हंगाम तोंडावर आला असतानाच कोडोली दत्तनगर येथे कण्हेरच्या उजव्या कालव्याला भगदाड पडल्याने शेतकर्‍यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. या कालव्यावर ओलिताखाली असलेल्या हजारो एकर जमीनीला पाणी मिळणार नसल्याने शेतकर्‍यांच्यावर त्सुनामी ओढवली आहे. कृष्णा सिंचन विभागाच्या माध्यमातून कालव्याच्या डागडूजीसाठी लाखो रूपयांचा निधी कागदोपत्री खर्च करून अधिकारी स्वत:चे खिसे भरत असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला असून संबधित अधिकार्‍यांला निलंबित करून त्याची चौकशी करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. दरम्यान, कालवा दुरूस्तीतील खाबुगिरी यानिमीत्ताने चव्हाटयावर आली असून कालव्यातील कामांच्या भ्रष्टाचारांची चौकशी करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी केली आहे.

अतिवृष्टीने शेतकर्‍यांची अपरिमित हानी झाली असून खरीप हंगामात नगदी पिकांची पेरणी न झाल्याने या संकटातून आजही शेतकरी सावरला गेला नाही. उशीरा पर्यंत पाऊ स सुरू राहिल्याने रब्बीच्या पेरण्यादेखील लांबल्याने पिकांची तितकीशी वाढ झाली नाही. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी पुर्णपणे उध्वस्त झाला आहे. यातून सावरताना शासनाकडून मिळालेली कर्जमाफी प्रत्येक शेतकर्‍याच्या पदरी पडली असे नाही. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये असंतोष आहे. एक पिकाचा हंगाम वाया गेल्याने रब्बीचे पिकतरी पदरात पडेल या अपेक्षेवर बळीराजा आहे.
 
सातारा जिल्ह्यात कोयना,धोम, कण्हेर हे मोठे प्रकल्प आहेत. या धरणांच्या पाण्यावरच रब्बीचा हंगाम अवलंबून असतो. कृष्णा सिंचन विभागाच्या गलथान कारभाराचा फटका सातारा तालुक्यातील शेतकर्‍यांना बसला आहे. कण्हेर जलाशयाच्या कालव्याखाली हजारो एकर क्षेत्र ओलीताखाली आहे. हा कालवा या पूर्वी अनेकदा फुटल्याने शेतकर्‍यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले होते. हा अनुभव पाठीशी असताना अधिकारी मात्र कुंभकर्णाच्या भूमिकेत आहेत. दरवर्षी कण्हेर आणि धोम धरणाच्या कालव्यांच्या डागडूजी आणि गाळ काढण्यासाठी कोट्यावधी रूपयांचा निधी शासनाकडून येत असला तरी प्रत्यक्षात या कामावर किती खर्च केला जातो हा विषय चिंत्तेचा आहे. कालवा दुरूस्तीचा खर्च कागदोपत्रींच होत असल्याने वरचेवर कालवा फुटण्याच्या घटना होत असल्याचा आरोप शेतकर्‍यांकडून होवू लागला आहे.

कण्हेरच्या कालव्याची बहुंताश सर्वच ठिकाणी दुरावस्था झाली असून याकडे संबिधत कालवा निरीक्षकासह अधिकार्‍यांची अक्षम्य दुर्लक्ष्य आहे. कोडोली येथील दत्तनगर नजीक कालव्याला ठिक ठिकाणी भगदाड पडले असून त्याच्या दुरूस्तीकडे कृष्णासिंचनच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी गांभीर्याने लक्ष दिले नाही. या कालव्याला भगदाड पडल्याने अधिकार्‍यांनी धरणातून होणारा पाणी पुरवठाच बंद केला आहे. या कालव्याखाली हजारो एकर क्षेत्र ओलिताखाली येत असल्याने पाण्याअभावी शेतकर्‍यांना रब्बीच्या हंगामात देखील आर्थिक नुकसानीच्या झळा सोसाव्या लागत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कालवा फुटीचे प्रकार घडत असताना आणि अधिकार्‍यांचे त्याकडे दुर्लक्ष होत असूनही स्थानिक लोकप्रतिनिधी मात्र मुग गिळून गप्प बसले आहेत. निवडणुकीत शेतकर्‍यांचा कळवळा येवून ऊ र बडवून घेणारे लोकप्रतिनिधींचे या मागे कोणते हितसंबध गुंतले आहेत असा आरोप आता शेतकरी करू लागले आहेत.