Your Own Digital Platform

सज्जनगड अशोकवनाला मिळणार संजीवनीरामदास स्वामी संस्थान करणार 65 लाख रुपये खर्च


स्थैर्य, सातारा : सज्जनगड येथे समर्थ रामदास स्वामी यांनी सुमारे ४०० वर्षांपूर्वी उभारलेल्या श्रीराम मंदिराचे जीर्ण झालेले सभागृह आणि त्यापुढील अशोकवनाचा कायापालट केला जाणार असून, त्यासाठी रामदास स्वामी संस्थानच्या वतीने ६५ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

साताऱ्याच्या पश्चिमेस साधारण १७ किलोमीटर अंतरावर सज्जनगड आहे. या ठिकाणी समर्थ रामदास स्वामी यांची समाधी आहे. तसेच त्यांनी उभारलेले समाधी मंदिर आहे. हे मंदिर काळ्या पाषाणात बांधण्यात आले असून, मंदिरापुढे सभागृह आहे. या सभागृहाची यापूर्वीही काही प्रमाणात दुरुस्ती केली होती.

हे सभागृह बहुतांश लाकडी आहे. सभागृहाला आत प्रकाश व हवा येण्यासाठी मोठ्या खिडक्या आहेत तेही पूर्ण लाकडे आहेत त्या अतिशय जीर्ण आणि बऱ्याच अंशी खिळखिळ्या झाले आहेत त्यामुळे त्याची दुरुस्ती नव्हे तर त्या पूर्ण बदलण्याची गरज आहे. खिडक्या, काही दरवाजे, वरील लाकडी छताची दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. हे काम आता संस्थानच्या वतीने हाती घेतले जाणार आहे. सर्व नक्षीदार खिडक्या व लाकूड कामासाठी दर्जेदार सागवान वापरले जाणार आहे.

सभागृहात प्रकाश आणि हवा सतत खेळती राहील, याची दक्षता घेतली जाणार आहे. सज्जनगडावर संस्थानच्या वतीने होणारे भक्तिसंगीत, कीर्तन, प्रवचन तसेच पारायणाचे सर्व कार्यक्रम या सभागृहात होतात. सभागृहाच्या छताला हंड्या, झुंबरे लावून सुशोभित केले जाणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब स्वामी यांनी दिली.
या सभागृहापुढे अशोकवन आहे. या मैदानात अशोकाची झाडे मोठ्या प्रमाणावर आहेत. मैदानभर गर्द सावली सतत पडत असते. या वनात सर्वत्र खाली दगडी फरशी आहे. उत्सव काळात भाविक मोठ्या प्रमाणात गडावर येतात. त्यावेळी भाविकांना या वनातच प्रसाद दिला जातो. मात्र, मैदानावरील फरशी सखल नाही. सर्वत्र चढ-उतार आहेत. त्यामुळे भाविकांना ते त्रासदायक होते. या ठिकाणी आकर्षक आणि मजबूत फरशी घालून अशोकवन सुंदर केले जाणार आहे. तसेच भाविकांना हात धुण्यासाठी, पाणी पिण्यासाठी अशोकवनात सुधारित व्यवस्था केली जाणार असल्याचेही श्री. स्वामी यांनी सांगितले.