Your Own Digital Platform

कबड्डी प्रमाणे खो-खो ला महत्व प्राप्त व्हावे - श्रीमंत राजराजे


राष्ट्रीय खो-खो स्पर्धेचे उदघाटन थाटात संपन्न

स्थैर्य, फलटण : कबड्डी खेळ ज्या प्रमाणे आशियायी स्पर्धेत खेळला जातो त्याच धर्तीवर खो खो हा खेळ खेळला जावा. कबड्डी या स्पर्धेला ज्या प्रमाणे राज्य, देश व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जातो त्याच प्रमाणे खो खो या खेळाला महत्व प्राप्त व्हावे अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण येथील माजी आमदार स्व. श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर क्रीडा नगरी मध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केले.

फलटण एज्युकेशन सोसायटी आणि जिल्हा क्रिडाधिकारी कार्यालय सातारा यांच्या संयुक्त सहभागाने येथील श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर क्रिडा नगरी, घडसोली मैदान, येथे आयोजित 65 व्या राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धा 2020 (14 वर्षाखालील मुले/मुली) चे उद्घाटन ना. बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते समारंभपूर्वक संपन्न झाले अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर होते. यावेळी आ. दिपक चव्हाण, महानंदचे उपाध्यक्ष डी.के.पवार, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, उपळेकर देवस्थान ट्रस्टच्या सचिव श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, नगराध्यक्षा सौ. निताताई मिलिंद नेवसे, पंचायत समिती उपसभापती सौ. रेखा खरात व सदस्य श्रीमंत विश्‍वजीतराजे नाईक निंबाळकर, सौ. रेश्मा भोसले, संजय कापसे, नानासाहेब लंगुटे, श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर, क्रिडा व युवक सेवा संचलनालयाचे सहसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे, उपसंचालक डॉ. माणिकराव ठोसरे, जिल्हा क्रिडाधिकारी युवराज नाईक, प्रभारी तालुका क्रिडाधिकारी फलटण अनिल शिंदे, प्रभारी तालुका क्रिडाधिकारी खंडाळा महेश खुटाळे, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी क्षीरसागर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे पदाधिकारी, विविध राज्यातून आलेले खेळाडू त्यांचे प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापक यांच्यासह खो-खो प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छत्रपती शिवरायांची भूमी आणि खेळ व लोककलांच्या ऐतिहासिक महत्त्वाने संपन्न असलेल्या या भूमीत देशाच्या विविध भागातून आलेल्या खेळाडूंचे स्वागत करताना आपल्याला अतिव आनंद झाल्याचे नमुद करीत छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज यांचे आमच्या घराण्याशी नातेसंबंध असल्याच्या पार्श्‍वभूमीवर या मैदानावर स्पर्धा सुरु होण्यापूर्वी झालेला त्यांचा जयजयकार प्रेरणादायी असल्याचे नमूद करतानाच खो-खो ची पंढरी म्हणून फलटणचा होत असलेला उल्लेख लक्षात घेता येथे आयोजित करण्यात आलेली 65 वी राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धा यशस्वी होईलच तथापी येथील खो-खो चे प्रेरणादायी वातावरण खेळाडूंना सतत प्रेरणा देत राहील असा विश्‍वास महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षपदाची जबाबदारी श्रीमंत संजीवराजे यांच्यावर सोपविण्यात आली त्यावेळी आपण त्यांना खो-खो ला अंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्याची ही संधी असून खा. शरदराव पवार, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी आतापर्यंत खो-खो व कबड्डीला दिलेले प्रोत्साहन लक्षात घेता कबड्डी पाठोपाठ खो-खो ही अंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी त्यांचे उत्तम सहकार्य व मार्गदर्शन लाभेल असा विश्‍वास व्यक्त करीत आज येथील राष्ट्रीय स्पर्धांसाठी मोजकी 3/4 राज्ये वगळली तर संपूर्ण देशभरातून खेळाडू येथे दाखल झाले असल्याने या खेळाला संपूर्ण देशभरातून मिळणारी साथ स्पष्ट झाल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

लोककला किंवा देशी खेळांना फलटणने संस्थान काळापासून प्रोत्साहन दिले असल्याने येथे कोणत्याही कलाकाराला आपली कला सादर करताना किंवा खेळाडूला खेळातील प्राविण्य दाखविताना उत्साह वाढत असल्याचे नमुद करीत राष्ट्रीय पातळीवरील देशी खेळाच्या स्पर्धा येथे यापूर्वीही आयोजित केल्या गेल्या त्या प्रत्येक वेळी फलटणकरांनी दिलेले योगदान प्रेरणादायी असून पुन्हा पुन्हा राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करण्याची संधी मिळणे हे फलटणकरांचे सौभाग्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केले. 

खो-खो, कबड्डी किंवा अन्य खेळांच्या राज्य शासनाच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत असलेल्या राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या नियोजनाशिवाय यशस्वी होत नसल्याचे नमुद करीत फलटणला स्वातंत्र्यपूर्व काळापासून खेळाची उज्वल परंपरा लाभली असल्याने येथे या देशी खेळांचे असंख्य नामवंत खेळाडू तयार झाले आहेत. श्रीमंत रामराजे किंवा खो-खो असोसिएनशचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे यांची खेळाविषयी असलेली अपुलकी त्यातून त्यांनी अनेकवेळा येथे राष्ट्रीय व राज्यस्तरिय स्पर्धा यशस्वी केल्या असल्याने या स्पर्धाही निश्‍चितपणे उत्तम प्रकारे पार पडतील याची आपल्याला खात्री आहे. विविध राज्यातून आलेल्या खेळाडूंनी मैदानावर शिस्त, संयम ठेवून आपला खेळ यशस्वी करावा आणि येथील जाणकार खेळाडूंना खेळाचा आनंद घेण्याची संधी द्यावी अशी अपेक्षा ना. बाळासाहेब पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. 

फलटणकरांनी यापूर्वीही राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धा यशस्वी केल्या असल्याने त्यांना त्याच्या नियोजनाची माहिती असल्याने येथे देशाच्या विविध भागातून आलेले खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, संघाचे व्यवस्थापक, पंच व अन्य सर्वांची सोय उत्तम होईल याची आपल्याला खात्री असल्याचे नमुद करीत सर्वांनी खेळातील प्राविण्य सिध्द करतानाच फलटणकरांच्या पाहुणचाराचा अस्वाद घ्यावा असे आवाहन यावेळी ना. बाळासाहेब पाटील यांनी केले.
 
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्तविकात आजच्या स्पर्धेसाठी देशभरातून मुलांचे 30 व मुलींचे 30 असे एकुण 60 संघ दाखल झाले असून त्या माध्यमातून सुमारे 900 ते 1000 खेळाडू, 250 क्रिडा मार्गदर्शक, संघ व्यवस्थापक आणि 100 वर पंच येथे दाखल झाले असून त्यासर्वांची निवास व भोजन व्यवस्था उत्तम करण्यात आली आहे. त्याचबरोबर आगामी 3 दिवस सुरु राहणार्‍या या स्पर्धांसाठी श्रीमंत शिवाजीराजे क्रिडा नगरीमध्ये 4 मैदाने तयार करण्यात आली आहेत. प्रेक्षकांसाठी सुमारे 5 हजार क्षमतेची प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली असून स्पर्धांच्या दृष्टीने आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

फलटण एज्युकेशन सोसायटी क्रिडा समितीचे अध्यक्ष शिवाजीराव घोरपडे यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले.
 
दरम्यान स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडियम स्कूल (सीबीएससी) आणि एसएससी या दोन्ही विभागांनी अनुक्रमे आंध्र राज्यातील लमाणी नृत्य आणि महाराष्ट्रीय दांडपट्टा, लाठीकाठीचे प्रात्यक्षिक सादर केले. तर प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेन्ट स्कूलच्या विद्यार्थ्यांनी छ. शिवाजी महाराज यांच्या राज्यकारभाराची वैशिष्ठ्ये विविध उपक्रमातून सादर केली. श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेझीम मधील विविध क्रिडाप्रकार उत्तम प्रकारे सादर केले. 

फलटणला लाभलेल्या खेळाच्या उज्वल परंपरेच्या पार्श्‍वभूमीवर राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये उज्वल यश आणि सुवर्णपदक प्राप्त खेळाडू कु. देविका घोरपडे (बॉक्सींग), कु. प्रतिक्षा खुरंगे (खो-खो), अभिजित (सायकलींग) आणि प्रांजल माडकर (खो-खो) या खेळाडूंचा ना. बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. 

ना. बाळासाहेब पाटील यांनी सलग 5 वेळा विधानसभेची निवडणूक जिंकून मिळविलेली लोकप्रियता त्याचबरोबर सह्याद्री सहकारी साखर कारखाना चालविताना प्राप्त केलेले उज्वल यश आणि आता राज्याच्या मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून झालेल्या समावेशाबद्दल फलटणकरांच्यावतीने श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

खो खो साठी नगरपालिकेकडून 5 लाखाचा निधीचा धनादेश सुपूर्त

स्थैर्य, फलटण : फलटण नागरपालिकेकडून नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेच्या ठरावानुसार रुपये 5 लाखाचा धनादेश नगरपालिकेच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी नाईक यांच्याकडे सुपूर्द करताना महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर समवेत नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, राहुल निंबाळकर, अनिल शिरतोडे, अमरसिंह खानविलकर, भाऊ कापसे व मान्यवर.

श्रीमंत सत्यजितराजेंकडून खो-खोच्या ग्राउंडची पाहणी

स्थैर्य, फलटण : गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्टचे संचालक व युवा नेते श्रीमंत सत्यजितराजे संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण येथे श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर क्रीडा नगरी येथे आयोजित राष्ट्रीय खो खो स्पर्धेच्या ग्राउंडची पाहणी केली. या वेळी श्रीमंत सत्यजितराजे यांनी विविध राज्यातून आलेल्या खेळाडूंशी संवाद साधला व व्यवस्था नीट झाली आहे का ? या बाबत खेळाडूंची आस्थेवाईकपणे चौकशी केली.