Your Own Digital Platform

ज्येष्ठ पत्रकार विलास माने यांचे निधन


सातारा : सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार व दै. ‘पुढारी’चे माजी विभागीय व्यवस्थापक विलास दत्तात्रय माने (वय 64) यांचे अल्प आजाराने नुने, ता. सातारा येथे निधन झाले.

विलास माने यांनी पोलिसवाणी, दै. ऐक्य, दै. पुढारी या वृत्तपत्रांमध्ये प्रदीर्घकाळ पत्रकारिता केली. ‘पुढारी’चे विभागीय व्यवस्थापक हे पदही त्यांनी बराच काळ भूषवले. मुक्काम पोस्ट पोवईनाका या त्यांच्या गाजलेल्या सदराने एक चाहता वर्ग निर्माण केला. मांडवझळा, सोक्षमोक्ष ही पुस्तके तर विलासिका हा चारोळ्यांचा संग्रह ही त्यांनी प्रकाशित केला. लालबहादूर शास्त्री महाविद्यालय व कला वाणिज्य महाविद्यालयातील मुक्त विद्यापीठाच्या पत्रकारिता अभ्यासकेंद्रात त्यांनी अध्यापनही केले. विविध पुरस्कारांनी विलास माने यांना सन्मानित करण्यात आले होते. पत्रकारितेच्या कालावधीत त्यांनी सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम केले. बहुजन समाजातील शेकडो पत्रकार त्यांनी मुख्य प्रवाहात आणले.
 
मंगळवारी रात्री उशिरा अल्प आजाराने त्यांचे निधन झाले. बुधवारी सकाळी सातार्‍यातील संगममाहुली येथे कैलास स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पत्रकारितेबरोबरच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.