Your Own Digital Platform

तालीम संघातील मुले भविष्यात ऑलिम्पिकमध्ये जातील : ना. पाटील


स्थैर्य, सातारा : अगोदर तालमीचा सराव करण्यासाठी कोल्हापूरला जाऊन करावा लागत असे. भाऊंना या वयातही कुस्तीची तळमळ आहे. मातीतली कुस्ती जगली पाहिजे. जगात पुढे जायचे असेल तर कुस्तीतील बदल स्वीकारले पाहिजेत म्हणून मॅटवरील कुस्ती असावी. सातारच्या तालीम संघाकडून या सुविधा पुरवल्या जात आहेत, ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे भविष्यात सातारच्या तालीम संघातील मुले ऑलिम्पिकमध्ये जातील, असे प्रतिपादन सहकार व पणन मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
 
येथील जिल्हा तालीम संघाच्यावतीने आयोजित जाहीर सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी ना. बाळासाहेब पाटील यांचा सत्कार साहेबराव पवार यांच्या हस्ते व गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांचा सत्कार माजी आमदार विलासकाका उंडाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. विलासकाका उंडाळकर यांचा सत्कार साहेबराव पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी साहेबराव पवार, तालीम संघाचे पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी व सातारकर नागरिक उपस्थित होतो. सुधीर पवार यांनी प्रास्ताविक केले. 
 
ना. पाटील म्हणाले, कुस्तीचा व राज्याचा विशेषत: पश्‍चिम महाराष्ट्राचा चांगला संपर्क आहे. छत्रपती शाहू महाराजांनी कुस्तीला राजाश्रय दिला. विविध खेळात कटुता असते. परंतु कुस्तीमध्ये जिव्हाळ्याचे संबंध असतात. मध्यंतरी कुस्तीगीरांची संख्या कमी झाली होती. सध्या कुस्ती क्षेत्राकडे मल्लांचा कल वाढला आहे. जिल्ह्यातील तालीम संघाचे काम चांगले आहे. बर्‍यापैकी पैलवान महाराष्ट्र केसरी झाले की सत्काराच्या नादात कुस्ती विसरून जातो. परंतु आपल्यातील पैलवानांनी सर्वोच्च पदापर्यंत गेले पाहिजे. सहकारी संस्थांनी तालीम संघासाठी सहकार्य करावे. तालीम संघासाठी जेे काही सहकार्य करता येईल ते मी माझ्यापरीनेे करेन.
 
साहेबराव पवार म्हणाले, यशवंतराव चव्हाण साहेब यांच्यापासून जिल्ह्याची राजकारण व विकासात चढती कमान आहे. आजच्या काळात सातारा जिल्ह्यात असाच तेजस्वी आहे. जिल्ह्यातील सध्या शंभूराज देसाई व बाळासाहेब पाटील हे दोन मंत्री आहेत. ज्यावेळी जिल्ह्यातून मंडळी मंत्रिमंडळात गेली त्यांनी त्यांचा ठसा उमटवला. जिल्ह्यातील सात-सात पिढ्या निवडून आलेली मंडळी आहेत. आम्ही ज्यावेळी कुस्तीचा सराव करत होतो तेव्हा दुसर्‍या तालमीत सराव करावा लागायचा. म्हणून आम्ही तालीम बांधावी, असे सहकार्‍यांना सांगितले. बाळासाहेब देसाई यांनी तालमीसाठी सव्वा तीन एकर जागा दिली. हे जगातील पहिले उदाहरण आहे. या तालीम संघाचे आज नंदनवन झाले आहे. गेली 60 वर्षे तालीम संघाची वाटचाल सुरू आहे. काही अडचणी आल्या त्या पार पाडल्या. ही तालीम 60 वर्षांची झाली म्हणून तिचे नवीन रूपांतर करावे म्हणून नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. माझ्या हाताखालून 40 हजार पैलवान तयार होऊन गेले. ही तालीम तयार झाली की जिल्ह्याचे नाव होईल. हे कार्य पूर्ण करायचे आहे.
 
ना. शंभूराज देसाई म्हणाले, लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यासह जुन्या मंडळींचे कुस्तीवर प्रेम होते. ते राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष होते. कुस्तीगीर परिषदेने अशक्य होईल ते त्यांनी कुस्ती मल्लांसाठी सहकार्य केले. 12 हजार स्क्वेअर फूट जागा असणारी तालीम संघाची इमारत ही महाराष्ट्रातील पहिली आहे. कार्यकारिणी सदस्य म्हणून लागेल ते सहकार्य करेन. तालीम संघासाठी मतदारसंघाबरोबर या कामासाठी ही सहकार्य करेन. त्यांनी जिल्हा तालीम संघ, तालुका व छोट्या-मोठ्या तालमींना उर्जितावस्था दिली. मल्लांना सरकारी नोकरीमध्ये संधी दिली. साहेबराव पवार हे तालमीकडे काळजीपूर्वक लक्ष देत आहेत. त्यांनी तालमीचे पालकत्व स्वीकारले आहे. हा सत्कार कुटुंबातला व घरातला आहे.
 
विलासकाका उंडाळकर म्हणाले, तालीम संघाशी माझा 60 वर्षं संबंध आहे. जिल्हा परिषद सदस्य झालो तेव्हापासून तालीम संघ पाहतोय. सुरुवातीला तालीम संघ हे लहान रोपटे होते त्याचा आता विशाल वटवृक्ष झाला आहे. ते सातारचे रक्षा कवचकुंडल आहे. हे एक शक्ती स्थळ आहे. मल्लविद्येची जोपासना करण्यासाठी मल्ल येथे येतात हे सातारचे वैभव आहे. सर्व जाती धर्मातील मुले तालीम संघात येत आहेत म्हणून तालीम संघावर प्रेम करणे गरजेचे आहे. संघावर अनेक संकटे आली ती उद्वस्त करून टाकली. या तालमीत गरीब मुले येतात. पैलवान हे समाज बलवान करणारी शक्ती आहे. आपल्याला जे जे करता येईल ते आपण करूया. जग बदलतंय आपणही बदलले पाहिजे. तालीम संघाच्या प्रगतीला हातभार लावला पाहिजे. साहेबराव पवार यांच्या हस्ते विलासकाका उंडाळकर यांचा सत्कार करण्यात आला.