Your Own Digital Platform

खो खो खेळाच्या माध्यमातून खेळाडूंनी देशाचे नाव उज्वल करावे - पालकमंत्री बाळासाहेब पाटील


फलटण येथे राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे दिमाखदार उदघाट्न

स्थैर्य, सातारा : खो खो हा खेळाच्या राष्ट्रीय स्पर्धातून जिल्ह्याला एक नवी ओळख निर्माण होणार असून खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून या खेळाचा नावलौकिक वाढवावा आंतराराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्वल करावे असे प्रतिपादन सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा व फलटण एज्युकेशन सोसायटी,फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 65 वी राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री बाळासाहेब पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर होते.

प्रारंभी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहन करुन ज्योत प्रज्वलित करण्यात आली. तसेच त्यांच्या हस्ते हवेत बलून सोडून स्पर्धेची सुरुवात करण्यात आले.

यावेळी आ. दिपक चव्हाण, महानंदचे उपाध्यक्ष डी.के.पवार, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, उपळेकर देवस्थान ट्रस्टच्या सचिव श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, नगराध्यक्षा सौ.निता नेवसे, पंचायत समिती उपसभापती सौ. रेखा खरात व सदस्य श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर, क्रिडा व युवक सेवा संचलनालयाचे सहसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे, उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा संचलनालय कोल्हापूर डॉ. माणिकराव ठोसरे, जिल्हा क्रिडाधिकारी युवराज नाईक, प्रभारी तालुका क्रिडाधिकारी फलटण अनिल शिंदे, प्रभारी तालुका क्रिडाधिकारी खंडाळा महेश खुटाळे, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी क्षीरसागर, प्रांताधिकारी जगताप, फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, शहर पोलीस निरीक्षक प्रताप पोमण यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे पदाधिकारी, विविध राज्यातून आलेले खेळाडू त्यांचे प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापक यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना श्री.पाटील म्हणाले, ऐतिहासिक फलटण शहरामध्ये अनेक खेळांना प्रोत्साहन देण्याचे काम सातत्याने होत असते. आज देशपातळीवरील स्पर्धा येथे आयोजित केली आहे. अशा स्पर्धा घेणे हे मोठे जोखमीचे काम आहे. अशा स्पर्धाचे नियोजन करणे ही फार मोठी जबाबदारी असते. या खेळाला चालना देत असताना अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धा राज्य शासनामार्फत घेतल्या जातात. आज या स्पर्धेच्या निमित्ताने देशभरातून आलेल्या खेळाडूंना महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडले. या नगरीमधील परंपरा त्यानिमित्ताने पुढे आली. विविध राज्यामधून आलेल्या खेळाडूंची सोय येथे चांगल्या प्रकारे करण्यात आली आहे. खो-खो, कबड्डी किंवा अन्य खेळांच्या स्पर्धा राज्य शासनाच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत असलेल्या राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या नियोजनाशिवाय यशस्वी होत नसल्याचे नमुद करीत फलटणला स्वातंत्र्यपूर्व काळापासून खेळाची उज्वल परंपरा लाभली असल्याने येथे या देशी खेळांचे असंख्य नामवंत खेळाडू तयार झाले आहेत. श्रीमंत रामराजे किंवा खो-खो असोसिएनशचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे यांची खेळाविषयी असलेली अपुलकी त्यातून त्यांनी अनेकवेळा येथे राष्ट्रीय व राज्यस्तरिय स्पर्धा यशस्वी केल्या असल्याने या स्पर्धाही निश्चितपणे उत्तम प्रकारे पार पडतील याची आपल्याला खात्री आहे. खेळाडूंनीच आपल्या खेळाच्या माध्यमातून देशाचे नाव उज्वल करावे असे सांगून त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

छत्रपती शिवरायांची भूमी आणि खेळ व लोककलांच्या ऐतिहासिक महत्त्वाने संपन्न असलेल्या या भूमीत देशाच्या विविध भागातून आलेल्या खेळाडूंचे स्वागत करताना आपल्याला अतिव आनंद झाल्याचे नमुद करीत छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज यांचे आमच्या घराण्याशी नातेसंबंध होते. येथे आयोजित करण्यात आलेली 65 वी राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धा यशस्वी होईलच तथापी येथील खो-खो चे प्रेरणादायी वातावरण खेळाडूंना सतत प्रेरणा देत राहील असा विश्वास महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.

दरम्यान स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात स्थानिक शालेय विद्यार्थ्यांनी आंध्र राज्यातील लमाणी नृत्य आणि महाराष्ट्रीय दांडपट्टा, लाठीकाठीचे प्रात्यक्षिक, छ. शिवाजी महाराज यांच्या राज्यकारभाराची वैशिष्ठ्ये, लेझीम मधील विविध क्रिडाप्रकार उत्तम प्रकारे सादर केले.

फलटणला लाभलेल्या खेळाच्या उज्वल परंपरेच्या पार्श्वभूमीवर राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये उज्वल यश आणि सुवर्णपदक प्राप्त खेळाडू खेळाडूंचा बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
बाळासाहेब पाटील यांचा राज्याच्या मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून झालेल्या समावेशाबद्दल फलटणकरांच्यावतीने श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
स्पर्धेसाठी देशाच्या 20 राज्यातून मुलांचे 30 व मुलींचे 30 असे एकुण 60 संघ दाखल झाले असून त्या माध्यमातून सुमारे 900 ते 1000 खेळाडू, 250 क्रिडा मार्गदर्शक, संघ व्यवस्थापक आणि 100 वर पंच येथे दाखल झाले आहेत. स्पर्धांसाठी श्रीमंत शिवाजीराजे क्रिडा नगरीमध्ये 4 मैदाने तयार करण्यात आली आहेत. प्रेक्षकांसाठी सुमारे 5 हजार क्षमतेची प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली असल्याचे प्रस्ताविकात महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे आभार क्रीडा समिती फलटण एज्युकेशन सोसायटी फलटणचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे यांनी केले.