Your Own Digital Platform

बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी स्वावलंबी बनावे : शोभा माळी

बचत गट स्टॉल उद्घाटन प्रसंगी मान्यवर.

स्थैर्य, कातरखटाव : महिलांची आर्थिक उन्नती व्हावी, त्यांना बचतीची सवय लागावी यासाठीच महिला बचत गट संकल्पना उदयास आली असून बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी स्वावलंबी बनावे असे प्रतिपादन माजी नगराध्यक्षा शोभा माळी यांनी केले.

वडूज (ता.खटाव ) येथे महिला बचत गटाच्या वतीने यशवंत मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या महिला मेळावा, हळदी -कुंकू व बचत गटाच्या माध्यमातून सुरू असलेल्या व्यवसायांच्या स्टॉल प्रदर्शन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी किरण उदमले, एस.आर. पाटोळे,उपनगराध्यक्षा किशोरी पाटील, बचत गटाच्या संघटक वनिता गुजर,नगरसेविका सुनीता कुंभार, डॉ. नीता गोडसे, सुवर्णा चव्हाण,मंगल काळे, काजल वाघमारे, ब्राम्हकुमारी राणी बहेनजी यांची प्रमुख उपस्थिती होती.
माळी म्हणाल्या की, चूल आणि मूल या संस्कृतीतून महिला आता बाहेर पडली असून स्वकर्तृत्वावर पुढे येत आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे.महिलांचे संघटन होऊन चांगल्या विचारांची देवाण -घेवाण करण्याचे काम बचत गटाच्या माध्यमातून होत असून महिलांनी उद्योग धंद्याच्या माध्यमातून आर्थिक स्रोत उभा करून आपल्या कुटुंबियांना मदत करावी असे आवाहन ही माळी यांनी केले.

यावेळी यशवंत बाबा , जय किसान, स्नेह, एकता, दिशा, उत्कर्ष आदी बचत गटाच्या पदाधिकारी, सदस्यां व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रतीक्षा भोसले यांनी आभार मानले.