Your Own Digital Platform

सराईत मोटरसायकल चोरटा जेरबंद


स्थैर्य, सातारा : शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने एका सराईत मोटरसायकल चोरट्यास पाठलाग करून मोळाचा ओढा चौकात जेरबंद केले. शुभम दीपक कडव, रा. आझादनगर कॉलनी, मोळाचा ओढा, सातारा असे संशयित मोटरसायकल चोरट्याचे नाव आहे.
 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुरुनंदन रेसिडेन्सी समर्थनगर, मोळाचा ओढा, सातारा येथील पार्किंगमधून 15 हजार रुपये किमतीची स्लेंडर मोटरसायकल (एम एच 11 एए 3086) अज्ञात इसमाने चोरून नेल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दि. 18 जानेवारी रोजी नोंद करण्यात आली होती. त्या अनुषंगाने तपास करत असताना सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख व शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेस सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे दि. 3 रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना मोळाचा ओढा येथे शुभम दीपक कडव हा विनानंबरची काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटारसायकल घेवून मेढा बाजूस जात असताना पोलिसांना दिसून आला. पोलिसांना त्याचा संशय आल्याने त्यांनी त्यास थांबण्यास सांगितले. परंतु पोलिसांना पाहून त्याने मोटारसायकलसह पळ काढला. त्यामुळे पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्यास मोळाचा ओढा चौकात गाठले. त्या ठिकाणी त्याला थांबवून ताब्यात असलेल्या मोटारसायकलबाबत विचारपूस केली असता प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यास पोलिसी खाक्या दाखवित कौशल्याने तपास करता त्याने ताब्यातील मोटरसायकल चोरीची असल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याचेकडून चोरीस गेलेली 15 हजार रुपये किमतीची स्प्लेंडर मोटारसायकल हस्तगत केली आहे. पुढील तपास पोलीस नाईक पंकजा जाधव करीत आहेत. या कारवाईत पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांचे मार्गदर्शनाखाली शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, संदीप शितोळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल हिम्मत दबडे-पाटील, हसन तडवी, पोलीस नाईक लैलेश फडतरे, अमित माने, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल कुंभार, पंकज मोहिते, ओंकार यादव, मोहन पवार यांनी सहभाग घेतला.