Your Own Digital Platform

सातारा जिल्हा बँकेचा स्तुत्य उपक्रम - पंचायत समिती महाबळेश्वर येथे ए.टी.एम. सेवा कार्यान्वित : मा. ना. बाळासाहेब पाटील


स्थैर्य, सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सातारा महाबळेश्वर शाखा अंतर्गत पंचायत समिती येथे ए.टी.एम. सेवेचा शुभारंभ बँकेचे संचालक व सहकार व पणन मंत्री मा. ना. बाळासाहेब पाटील यांचे अध्यक्षतेखाली व मा. आ. मकरंद पाटील यांचे शुभहस्ते तसेच प्रमुख पाहुणे व बँकेचे अध्यक्ष मा. आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले , उपाध्यक्ष श्री. सुनील माने, संचालक श्री विक्रमसिंह पाटणकर, श्री. शशिकांत शिंदे, श्री. प्रभाकर घार्गे, श्री. दत्तानाना ढमाळ, श्री. नितीन पाटील, श्री. राजेश पाटील, श्री. प्रदीप विधाते, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. बाळासाहेब भिलारे, महाबळेश्वर नगरपालिकेचे उपाध्यक्ष श्री. अफजल सुतार, पंचायत सभापती सौ. अंजनाताई कदम, उपसभापती. श्री संजय गायकवाड व मान्यवरांचे प्रमुख उपस्थितीत शनिवार दिनांक ०१/०२/२०२० रोजी संपन्न झाला.
 
महाबळेश्वर येथील शेतकरी, पर्यटक व ग्राहकांना मध्यवर्ती ठिकाणी ए.टी.एम. सुविधा उपलब्ध होणेकारिता माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी उपाध्यक्ष श्री. बाळासाहेब भिलारे यांचे प्रयत्नाने व बँकेचे संचालक श्री. राजेंद्र राजपूरे यांच्या पाठपुराव्यामुळे तसेच पंचायत समिती महाबळेश्वर यांच्या सहकार्यामुळे मध्यवर्ती ठिकाणी ए.टी.एम. कार्यान्वित करणेचा सोहळा संपन्न झाला.
 
यावेळी मा. ना. बाळासाहेब पाटील म्हणाले, बँकेने नेहमीच ग्राहकाभिमुख धोरणांचा स्वीकार केला आहे तसेच अधिकाधिक सामान्य ग्राहकांपर्यंत बँकिंग सुविधा मिळाव्यात याकरिता शहरी व ग्रामीण भागात शाखा कार्यान्वित केल्या आहेत. इतर बँकांच्या तोडीस तोड, दर्जात्मक, अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त बँकिंग सेवा सुविधा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यास बँक यशस्वी झाली असून बँकेच्या विकासाभिमुख योजनाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन केले. तसेच महाबळेश्वर येथे स्ट्रोबेरी संशोधन केंद्र उभारणीस सर्वोतोपरी मदत करणेचे आश्वासन दिले.
 
मा. आ. मकरंद पाटील म्हणाले, सातारा जिल्हा बँकेचे सर्वकष कामकाजाची नोंद देशाबाहेरही झालेली असून, बँकिंग कामकाजा व्यतिरिक्त सामाजिक बांधिलकीचे माध्यमातून बँक विकासाभिमुख कामकाज करीत आहे. ग्राहकांना जलद व तत्पर बँकिंग सुविधा प्राप्त होणेकारिता जिल्ह्यात महत्वाच्या ठिकाणी ए.टी.एम. सुविधा शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातही उपलब्ध करून दिल्या असून याचा सर्व ग्राहकांनी लाभ घेणेचे आवाहन केले.
 
श्री. बाळासाहेब भिलारे यांनी बँकेने पंचायत समिती महाबळेश्वर येथे ए.टी.एम. द्वारे शेतकरी, पर्यटक व ग्राहकांना चांगली सुविधा उपलब्ध करून दिलेबद्दल विशेष कौतुक केले. महाबळेश्वर येथील शेतकऱ्यांना जिल्हा बँकेने मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा केला असलेचे स्पष्ट केले.
 
याप्रसंगी संचालक श्री. राजेंद्र राजपुरे म्हणाले, या ठिकाणी नवीन ए.टी.एम. सुविधा सुरु होत असलेमुळे ग्राहकांना उत्तम सेवा-सुविधा मिळणार आहेत .देशात सहकार क्षेत्रात चांगला नावलौकिक मिळविलेल्या बँकेची बँकेने सहकारी बँकिंगपुढे चांगला आदर्श निर्माण केलेला आहे . जिल्हा बँक कायमच सामाजिक बांधिलकी जपत असून शेतकरी सभासदांचे आर्थिक जीवनमान उंचावणेसाठी कटीबद्ध आहे. महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांना जिल्हा बँकेने स्ट्रोबेरीसाठी मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा केला असलेचे स्पष्ट केले. तसेच नियमित कर्जपरतफेड करणा-या शेतक-यांना जोतीराव फुले कृषी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळावा असेही त्यांनी सांगितले.
 
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, बँकेच्या उत्कृष्ट कामकाजामुळे नाबार्डने सलग ६ पुरस्कार देऊन गौरविले असून बँकेने सहकार क्षेत्रात चांगल्या कामकाजाचा ठसा उमटविलेला आहे. या बँकेचे जेष्ठ संचालक व विधानपरिषदेचे सभापती मा. ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,अध्यक्ष मा. आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व संचालक मंडळ यांचे मार्गदर्शनाखाली विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. बँकेने ग्राहकांना आधुनिक बँकिंगच्या सुविधा उपलब्ध करून देणेसाठी कोअर बँकिंग प्रणालीचा उपयोग केला असून ग्राहकांना आर.टी.जी.एस. /एनईएफटी, एसएमएस सुविधा, मोबाईल बँकिंग, इत्यादी तसेच समाजातील गरजू व वंचित घटकांना विकसित तंत्रज्ञानाच्या बँकिंग सोई सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
 
यावेळी बँकेचे कर्जदार श्री. गणेश शिंदे यांना कृषी पर्यटन व्यवसायासाठी रक्कम रु. ६० लाखाचे वितरण बँकेचे संचालक मा. आ. मकरंद पाटील यांचे हस्ते करणेत आले.
 
याप्रसंगी बँकेचे सरव्यवस्थापक श्री. राजेंद्र भिलारे, नगरपालिका सदस्य, पंचायत समिती सदस्य, महाबळेश्वर अर्बन बँकेचे चेअरमन श्र. राजेश कुंभारदरे, विभागीय विकास अधिकारी श्री. बेलोशे, तालुक्यातील सर्व सेवक वर्ग , विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे चेअरमन, सचिव, पदाधिकारी, शाखेचे अधिकारी व महिला वर्ग व सदस्य, ग्राहक, ठेवीदार व हितचिंतक , जेष्ठ नागरिक व तरुण उपस्थित होते .