Your Own Digital Platform

लेखा व कोषागारे दिन विविध उपक्रमांनी साजरा : गुणवंत कर्मचाऱ्यांचा गौरव


स्थैर्य, सातारा : कोषागारातील कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी कोषागारातर्फे 1 फेब्रुवारी हा लेखा व कोषागार दिन म्हणून साजरा केला जातो. सातारा जिल्हा कोषागार कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय तपासणी, पाककला, रांगोळी, पोस्टरस्पर्धा, फुल सजावट इ. विविध उपक्रम राबवून तसेच उत्कृष्ट कामकाज केलेल्या गुणवंत अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येऊन कोषागार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

लेखा व कोषागारे दिनानिमित्त जिल्हा नियोजन अधिकारी भगवान जगदाळे यांच्याहस्ते उत्कृष्ट कामकाज केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी स्थानिक निधीचे सहायक संचालक शार्दुल पाटील, जिल्हा कोषागार अधिकारी धनाजी शिंदे, अपर कोषागार अधिकारी सविता पाटील, लेखाधिकारी संकपाळ आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी श्री. जगदाळे यांनी उपस्थित सर्व अधिकारी-कर्मचा-यांना कोषागार दिनाच्या शुभेच्छा देऊन ते पुढे म्हणाले, जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मंजूर झालेल्या निधीतून निवृत्त वेतनधारकांच्या सुविधेसाठी जिल्हा कोषागारातील पेन्शन कक्षाचे अद्यावतीकरणाचे काम पूर्ण केले जाईल. तसेच लवकरच सुसज्ज अशा बैठक हॉलसाठी रु.96 लाखांचा निधी मान्यता मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाहीही श्री. जगदाळे यांनी दिली.

यावेळी उत्कृष्ट कामकाजासाठी निवड करण्यात आलेल्या कोरेगाव उप कोषागार अधिकारी मंदार जोशी(मेढा),शांताराम बरकडे(खंडाळा), वासंती जाभंळे, उपलेखापाल चैतन्य गाडगीळ, विजय जगताप, वरिष्ठ लिपीक सुधिर शिंदे, कनिष्ठ लेखापाल, संगिता पवार, लेखा लिपीक जयकुमार अहिवळे, रुपाली भोसले, लक्ष्मण भूप, अमित हांगे, शिपाई यांचा जिल्हा नियेाजन अधिकारी श्री. भगवान जगदाळे तसेच स्थानिक निधीचे सहायक संचालक शार्दुल पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी रांगोळी व पाक-कला, पोस्टर स्पर्धांतील विजेता कर्मचाऱ्यांचा सत्कारही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

प्रास्ताविकात जिल्हा कोषागार अधिकारी धनाजी शिंदे म्हणाले, कोषागाराच्या कामकाजात संगणकीय अमुलाग्र बदल झाल्यामुळे लोकाभिमूख कामकाज होऊन त्यामध्ये गतीमानता व पारदर्शकता आली आहे.
 
कार्यक्रमाचे स्वागत जिल्हा कोषागार अधिकारी धनाजी शिंदे तर आभार अपर कोषागार अधिकारी सविता पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयकुमार अहिवळे यांनी केले. कार्यक्रमास जिल्ह्यातील तसेच कोषागार कार्यालयातील सर्व अधिकारी-कमर्चारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.