Your Own Digital Platform

असा होता देव आनंद!


दंव आनंदपेक्षा खूपच चांगले असलेले अभिनेते त्याही काळी होते व आजही आहेत; पण इतका वक्तशीर, साधा, प्रामाणिक, जमिनीवर पाय असलेला व माणूसपण जपणारा एवढा मोठा स्टार आपण पाहिलेला नाही.
आयुष्यभर तो छोट्या फियाट गाडीतून आणि तेही ड्रायव्हरच्या शेजारी बसून फिरला. घरचा टेलिफोन नंबर तो
बिनदिक्कत डिरेक्टरीत छापत होता व तो फिरवला की, तो चिरपरिचित आवाज ऐकू यायचा ‘देव हिअर.’ सेक्रेटरी नावाची गोष्ट त्याच्या जीवनात नव्हती. भक्तांना लांब ठेवणारा व दूर लोटणारा हा देव नव्हता.
देव आनंदला गाठणं इतकं सोपं असेल हे त्याच्या असंख्य चाहत्यांना कधी कळलंच नाही. देव आनंदपर्यंत पोहोचणं अशक्यप्राय असणार, अशा समजुतीतच ते राहिले.
 
असा होता देव आनंद! 

‘देस परदेस’च्या ‘प्रेस शो’ नंतर ताजमहाल हॉटेलात झालेल्या पार्टीत मी देव आनंदला प्रथम भेटलो. मी आपणहून त्याच्या जवळ जायला धजावलो नाही. त्याच्या देखणेपणाच्या सौम्य आगीत मी होरपळून जाईन,अशी मला भीती वाटली. मी बुजुर्ग पत्रकार राम औरंगाबादकर याला माझी देव आनंदशी ओळख करून द्यायला सांगितली. औरंगाबादकर एक वल्ली होती. त्याच्या गळ्यातल्या बॅगेत त्याने एक हात मधुबालाच्या व एक मीनाकुमारीच्या गळ्यात घातलेला फोटो कायम असायचा. अधूनमधून तो फोटो काढून दाखवायचा व आमच्या डोळ्यांतील असूया पाहून आनंद घ्यायचा. 

‘‘अरे, देवला ओळखत नाहीस तू?’’ त्याने त्याच्या चिरकणार्‍या आवाजात विचारले. 

‘‘मी ओळखतो हो त्याला.’’ मी वरमून म्हणालो, ‘‘तो मला ओळखत नाही.’’ 

‘‘अरे!’’ राम औरंगाबादकरला नक्की कशाचं आश्‍चर्य वाटत होतं कळत नाही. 

त्यानंतर त्याने जे केलं ते तोच करू जाणे. ‘देव कम हिअर’ तो ओरडला. 

माझ्या छातीत धस्स झालं. मी वॉचमनलाही असं बोलावू शकलो नसतो. अर्थात पं. नेहरू देशाचे पंतप्रधान असताना ब्रॅबॉर्न स्टेडियमवरील कार्यक्रमात त्यांना राम औरंगाबादकरने ‘नेहरू’ अशी हाक मारली होती. मग तिथे देव आनंदचा काय पाड! देव आनंद त्याच्या दुडक्या चालीने आज्ञाधारकपणे आला. मला काय बोलावं ते
सुचेना. स्वाक्षरी तर घ्यायचीच होती, पण माझ्याकडे कागदाचा कपटाही नव्हता. देव आनंदला तिष्ठत ठेवून कागद शोधायला जाणं शक्य नव्हतं. माझ्या बॅगेत राज कपूर व मधुबालाचे फोटो होते. त्यातला मधुबालाचा आकाशाच्या पार्श्‍वभूमीवर ओढणी फडकवत हसणारा फोटो काढीत मी देवला आशाळभूतपणे विचारले, ‘‘यावर स्वाक्षरी करणार?’’ त्याने फोटोकडे पाहिले व तो उत्स्फूर्तपणे म्हणाला, ‘‘क्या बात कर रहे हो यार! एखाद फोटो और होगा तो मुझे दे दो.’’ झटक्यात पेन सरसावून त्याने मधुबालाच्या फोटोवर स्वाक्षरी केली व वर लिहिले ‘मे हर सोल रेस्ट इन पीस.’ 

असा होता देव आनंद! 

मी सकाळी नऊ वाजताची त्याची ‘अपॉइंटमेंट’ घेतली होती. तो वेळेच्या बाबतीत किती काटेकोर आहे हे माहीत असल्यामुळे मी पावणेनऊ वाजता आनंद रेकॉर्डिंग सेंटरला पोहोचलो. मी तळमजल्यावरच्या ‘फॉयर’मध्ये त्याची वाट बघत बसलो.त्याचा कोणीतरी माणूस मला शोधत व माझं नाव पुकारत आला. त्याने देव आनंदचा निरोप आणला होता, - ‘‘देवसाहेबांनी सांगितलंय की, त्यांना थोडा उशीर होईल. तुम्ही थांबा.’’ त्या माणसापाठोपाठ पाचच मिनिटांनी देव आनंद आला. तो तोंडानं ‘सॉरी सॉरी’ म्हणत होता. कशाबद्दल? पाच मिनिटे उशीर झाल्याबद्दल? तेही आधी माणूस पाठवून सांगितल्यावर? या भरतभूमीत एक सुपरस्टार पाच मिनिटे उशिरा येण्याला उशीर म्हणतो हे गोविंदा प्रभृतींना सांगा. त्यांची हसून हसून मुरकुंडी वळेल.
 
असा होता देव आनंद! 

‘‘अपयशानंतर नैराश्य येत नाही का?’’ एका भेटीत मी देव आनंदला विचारलं होतं.
 
‘‘येतं तर!’’ देव म्हणाला, ‘‘शेवटी मीदेखील माणूसच आहे. अपयशानंतर जरूर खचून जायला होतं, पण अल्पकाळ. मग नवीन कलाकृती तयार करण्याच्या कल्पनेनं नखशिखांत थरारून जातो. कुस्तीत खाली पडलेला पहेलवान जसा त्वेषाने तिरीमिरीत उठून प्रतिस्पर्ध्याला भिडतो तसं माझं वागणं असतं. यश आणि अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मी यशानं कधी उन्मत्त झालो नाही आणि अपयशाने खचून जाऊन बाटलीत दु:ख बुडवत बसलो नाही. गुरुदत्त माझा दोस्त होता. मोठा कलावंत. पण त्याचं काळीज सशाचं होतं. तो अपयश पचवू शकला नाही. 

या इंडस्ट्रीत तुम्हाला खूप खोटी माणसं सापडतील. ती नेहमी इंडस्ट्रीच्यानावानं शंख करीत असतात. छाती पिटून गळे काढीत असतात. बेटे लोटे घेऊन या मुंबईत, या फिल्म इंडस्ट्रीत आले. इथे गडगंज कमावलं व जिनं एवढं भरभरून दिलं त्या इंडस्ट्रीच्या नावानं ठणाणा करतात. चित्रपट काढणं हा एक रोमांचकारी खेळ आहे. हरण्याची ज्यांना भीती वाटत असेल त्यांनी खेळण्याच्या फंदात पडू नये. कुठेतरी दहा ते पाच नोकरी करून एक तारखेला निमूटपणे पगार घ्यावा. मी खूप पैसा घालवला, पण मी काही गमावलं असं मला वाटत नाही. पैसा - पैसा काय चीज आहे? मी मुंबईत आलो तेव्हा माझ्या खिशात अवघे तीस रुपये होते. आज माझी एवढी करीअर झाली. एवढ्या चित्रपटांत मी काम केलं. एवढे चित्रपट निर्माण केले. एवढी माणसं जोडली. लाखो चाहते मला मिळाले. मी गमावलं काय? काहीच नाही. आज माझ्याकडे स्वत:चा बंगला आहे, स्वत:ची गाडी आहे, स्वत:चं ऑफिस आहे, स्वत:चा स्टाफ आहे. तीस रुपड्या घेऊन मुंबईत आलेल्या एका फाटक्या माणसाला आणखी काय हवं...’ 

असा होता देव आनंद! 

दिलीपकुमार, राज कपूर व देव आनंद हे समकालीन सुपरस्टार होते, पण सैगलची नायिका खुर्शीद हिच्याबेराबर काम करणारा (चित्रपट ‘आगे बढो’) हा देव आनंद एकटाच.
 
टीना मुनीमपर्यंत नायिकांचा तो नायक झाला.
 
‘रसरंग’ने एकदा देव आनंद विशेषांक काढला. एका मराठी चित्रपट नियतकालिकाच्या या कृतीची देव आनंदने पत्र लिहून आवर्जून दखल घेतली. हा विशेषांक पुन्हा छापावा लागला. 

असा होता देव आनंद!
 
राज कपूरविषयी चांगलं बोलणारी किंवा नुसतं खुलून बोलणारी नायिका सापडणं अवघड होतं. नर्गिसला तर त्याने चित्रपटांमागून चित्रपटात फुकट राबवून घेतले. देव आनंदचे मात्र त्याच्या सर्व नायिकांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्या त्याच्याविषयी उमाळ्याने व भरभरून बोलतात. चित्रपटाची कथा किंवा पटकथा न ऐकता देवच्या एका फोनवर जाणारी हेमा मालिनी होती. 

‘‘तुझे तुझ्या सगळ्या नायिकांबरोबर इतके सलोख्याचे संबंध कसे?’’ मी त्याला एकदा विचारले.‘‘का नसावेत?" देव उसळून म्हणाला, ‘‘मी त्यांना फसवत नाही. त्यांचा गैरफायदा घेत नाही, त्यांना सन्मानाने वागवतो, चित्रपट संपल्यावरही त्यांच्या संपर्कात असतो. साहजिकच आमचे उत्तम संबंध आहेत.’’ 

असा होता देव आनंद! 

एकदा मी त्याला त्याच्या तंदुरुस्तीचं रहस्य विचारलं. ‘‘रहस्य काऽऽऽही नाही,’’ तो नेहमीच्या प्रसन्नपणे म्हणाला, ‘‘मी अतिरेकी वागत नाही.प्यायलो तरी उगीच उष्टावल्यासारखा पितो. पार्ट्यांना सहसा जात नाही. खा-खा खात नाही. सकाळी ब्रेकफास्ट घेतल्यावर जेवण हवंच असा माझा आग्रह नसतो.एखादं सफरचंद किंवा केकचा तुकडा यावर माझं भागतं. आमच्याकडे काही मंडळींना चिकन लागतं. तेही ठराविक हॉटेलातलं. माझे असले काही चोचले नसतात. तसा मी साधा माणूस आहे. माझ्या छोट्या फियाटमधून मी फिरतो. मोटारीच्या आकारावर कलावंताचं मोठेपण ठरतं असं मी मानत नाही. माझ्या गरजा फार कमी आहेत. मला काहीही चालतं. कुठंही बैठक मारून बसायची आणि आडवं व्हायची माझी तयारी असते. नो हँग अप्स, यू सी!’’
 
‘‘थोडक्यात, चॉंदनी मिली तो हम चॉंदनी मे सो लिये’’ असंच ना?’’ त्याच्याच तोंडच्या गाण्याची एक ओळ मी बोललो.‘‘अगदी!’’ देव खुषीत म्हणाला, ‘‘लेकिन चॉंदनी नही मिली तो भी निंदिया रानी हमसे दूर नही भागती जनाब! ‘दर्द भी हमें कबूल, चैन भी हमें कबूल.हमने हर तरह के फूल हारमें पिरो लिये’’. 

असा होता देव आनंद!
 
सकाळी फोन वाजला. माझ्या शाळकरी मुलाने घेतला.‘‘पपा, तो म्हणतोय की तो देव आनंद बोलतोय.’’ तो भेदरलेल्या चेहर्‍याने म्हणाला.तो देव आनंदच होता. ‘‘आपलं दुपारी अडीच वाजता भेटायचं ठरलं होतं. झालंय काय, माझे काही दिल्लीचे वितरक आलेत. ते आजच्या आज परत जाणार आहेत. आपली भेट आपण अर्धा तास पुढे ढकलली तर चालेल का? अडीचऐवजी तीन. नसेल जमत तर राहू दे. मी त्यांना नंतर बोलवीन.’’ 

असा होता देव आनंद!
 
एका भेटीत तो मला म्हणाला, ‘‘कुठे आहेस तू? पत्ता काय तुझा? परवाच मी तुझी ज्योती व्यंकटेशकडे आठवण काढली होती. कसे चाललेत तुझे एकपात्री कार्यक्रम?’’ माझ्या गळ्यात आवंढा आला. मी कोण? त्याने कशासाठी माझी आठवण काढायला हवी?कशासाठी माझ्या कार्यक्रमांची आठवण ठेवून चौकशी करायला हवी?... 

असा होता देव आनंद! 

असा देव आनंद गेला 

शिरीष कणेकर