Your Own Digital Platform

विषारी औषधाचा वापर करून महाबळेश्वर जवळ बिबट्याची हत्या, चार जण ताब्यात


स्थैर्य, महाबळेश्वर : महाबळेश्वर जवळ विषारी औषधाचा वापर करून बिबटयाची हत्या करून त्याची नखे काढून घेतल्या प्रकरणी वन विभागाने चार जणांना अटक केली आहे.

त्यांच्या कडून वन विभागाने बिबटयाची १८ नखे, एक कोयता व मृत बिबटयाचे अवशेष हस्तगत केले आहेत. न्यायालयाने चारही आरोपींची पाच दिवसांच्या वन कोठडीत रवानगी केली आहे.

१३ जानेवारी रोजी घोनसपूर (ता महाबळेश्वर) येथील बापु रखमाजी जंगम यांच्या गाईवर बिबटयाने हल्ला केला होता. या हल्ल्यात गाई ठार झाली होती. या गोष्टीचा राग मनात धरून बापु जंगम याने घरा जवळील जंगलात विषारी थायमेट हे औषध टाकले होते. त्या विषारी औषधा मुळे बिबटयाचा मृत्यु झाला होता .१५ जानेवारी रोजी बापु जंगम व अन्य तीन साथीदार यांनी या मृत बिबटयाची सर्व १८ नखे कोयत्याने तोडुन काढली.त्यातील बापु याने सहा नखे स्वतः घेतली व इतर तिघांना प्रत्येकी तीन तीन नखे दिली .मृत बिबटयाचे उरलेले अवशेष त्या चौघांनी जवळच्या जंगलात पुरून ठेवले. या बाबत वन विभागाला माहीती मिळाली असता त्यांनी या प्रकरणाची अधिक चौकशी केली .या चौकशी मध्ये तथ्य आढळुन आल्याने वन विभागाने बिबटयाच्या शिकार प्रकरणी संभाजी सदाशिव जंगम, बापु रखमाजी जंगम, पांडुरंग कृष्णा जंगम व शिवाजी धांडीराम जंगम सर्व जण (घोणसपुर ता महाबळेश्वर) यांना वन्यजीव अधिनियम कायद्यानव्ये अटक केली. आज या सर्व आरोपिंना न्यायालया समोर हजर केले असता त्यांची पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे .
या प्रकरणाची सर्व कारवाई उपवनसंरक्षक भारतसिग हाडा, सहा उपवनसंरक्षक व्ही बी भडाळे, यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे , वनपाल एस एम शिंदे , एस के नाईक , वनरक्षक ज्योती घागरे दिपक सोरट , आशिष पाटील , रोहीत लोहार सहदेव भिसे , लहु राउत , विश्वभंर माळझरकर , मुकेश राउळकर , माधव ताटेवाड , आकाश कुंभार विदया घागरे वनपाल एस के शिंदे आदींनी कारवाईत सहभाग घेतला .