Your Own Digital Platform

उंब्रजच्या महिला सरपंचावर राजकीय दबाव : अशोक गायकवाड यांची पत्रकार परिषदेत माहिती


स्थैर्य, सातारा : महिलांना संविधानाने 50 टक्के आरक्षण दिले असले तरी सत्तास्थानी असलेल्या कर्तबगार महिलांना काम करू दिले जात नाही. याचा प्रत्यय उंब्रज येथील प्रकारामुळे आला आहे. येथील महिला सरपंचास जातीवाचक शिवीगाळ केली जात होती. याविरोधात तिने तक्रार केली. मात्र, तिच्या मुलांवरच खोटे गुन्हे दाखल करून अ‍ॅट्रासिटीची तक्रार मागे घेण्याचा दबाव आणल्याचा आरोप रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी केला.
 
उंब्रज येथे अ‍ॅट्रासिटी प्रकरणाच्या अनुषंगाने रिपाइंचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी सातारा येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी गायकवाड म्हणाले, संविधानाने महिलांना 50 टक्के आरक्षण दिले असले तरी लोकांची मानसिकता अद्याप बदलली नाही. संविधानामुळे देशातील सर्व महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करू लागल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून अनुसुचित जाती-जमातीमधील महिलाही वेगवेगळ्या पदावर काम करू लागल्या अहेत. उंब्रज येथील सरपंच पदावर सौ. लता उत्तम कांबळे या 2015 पासून कार्यरत आहेत. तेंव्हापासून ग्रामपंचायतीचा कारभार चांगल्या पद्धतीने सुरू आहे. मात्र, संजय धोंडीराम जाधव व महेश यशवंत काशीद रा. उंब्रज हे वारंवार सौ. कांबळे यांच्या कार्यालयात येवून कारभाराविषयी भ्रष्टाचाराचा बागूलबुवा उभारून अपमानास्पद वागणूक देत होते. ‘तुझी सरपंच होण्याची लायकी नाही, या पदावरून हाकलून दिले पाहिजे,’ अशी भाषा त्यांना वापरण्यात येत होती. नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिनी ग्रामसभा संपल्यानंतर जाधव आणि काशीद यांनी सौ. कांबळे यांना जातीवाचक शिवीगाळ केली व त्यांच्या अंगावर धावून गेले. या प्रकाराबाबत सौ. कांबळे यांनी उंब्रज पोलिस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार दिली. मात्र, त्यांची तक्रार घेण्याऐवजी सौ. कांबळे यांच्या मुलांवरच पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल करून अटक केली. ज्यांच्याविरोधात अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल केला त्यांना ताब्यात घेतले नाही. मुलांवरील गुन्हे मागे घ्यायचे असतील अ‍ॅट्रासिटीची तक्रार मागे घ्या, असा सौ. कांबळे यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोपही अशोक गायकवाड यांनी केला आहे.
 
अशा प्रकारामुळे समाजात तेढ होत आहे. पोलिसांनी चौकशी करून सौ. कांबळे यांच्या मुलांवरील गुन्हे मागे घ्यावेत व जातीवाचक शिवीगाळप्रकरणी संजय जाधव व महेश काशीद यांना तत्काळ अटक करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा गायकवाड यांनी दिला आहे.
 
दरम्यान, सरपंच लता कांबळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गावगुंड लोकांच्या दहशतीमुळे त्यांच्याविरोधात साक्ष द्यायला कोणीही तयार नाही. यामुळे आम्ही असेच अपमानीत होत असू तर आमचे आरक्षणच बंद करून टाका. संविधानाचा जर अपमान होत असेल तर माझा राजीनामा घेवून मला पदमुक्त करावे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.