Your Own Digital Platform

सातार्याची धकधक गर्ल .... !!


सिंधुदुर्ग महोत्सवाच्या निकालाची परीक्षक घोषणा करू लागतात तोच निकालापूर्वीच प्रेक्षकांत 'माधुरी-माधुरी' असा जयघोष सुरू होतो. "...आणि अर्थातच विजेती आहे... तुमची-आमची दिल कि धडकन - सातार्याची माधुरी .. माधुरी पवार!!" 

परीक्षक प्रेक्षकांच्या भावनेला दुजोरा देतात. टाळ्या-शिट्यांच्या खणखणाटाने वातावरण काही क्षण माधुरीमय होते. याच टाळ्यांच्या कडकडाटात मग माधुरी बक्षीस स्वीकारते..भारावलेल्या वातावरणात स्पर्धा संपते..प्रेक्षक प्रेक्षागृहातून बाहेर पडतात. आता निव्वळ माधुरीची दिलखेचक अदा,तिचा डांस , एनर्जी आणि तिचं बेभानपण प्रत्येकाच्या नसा-नसांत उरलेलं असतं ... !

माधुरी ज्योतिराम पवार ..ही सातार्याच्या बुधवार नाक्याजवळ राहणारी एक गरीब घरची मुलगी..आई कल्पना आणि वडील ज्योतिराम पवार यांनी मोठ्या कष्टातून तिला सांभाळलेलं ... गवंडीकाम करणारे ज्योतिराम पवार हे स्वतः एक हौशी डांसर ..पण परिस्थितीच्या वादळापुढे त्यांच्या कलेचं प्लॅस्टर टिकलेलं नाही...पण त्यांची पोरगी मात्र कमालीची जिद्दी आहे.. डांस तिच्या रक्तात भिनलेला.. आई-वडीलांच्या जीन्समधून पुढे पाझरलेला.. स्वतःच्या हिंमतीवर या कलेला वाढवत सबंध महाराष्ट्राला मोहिनी घालणारी ही नृत्यतारका बापाच्या तडे गेलेल्या कलेत आज सलमा भरण्याचं काम करते आहे.... !

माधुरीचं शिक्षण कन्या शाळेत झालं.. पुढे महाविद्यालयीन शिक्षण तिने एलबीएस काॅलेजमधून पूर्ण केलं..तर त्यानंतर पुढे एमबीएही पूर्ण केलं... लहानपणापासून ती शिक्षणात हुशार होती..घरची परिस्थिती बदलवायची असेल तर शिकायला हवं हीच तिची धारणा होती...शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी मग ती शाळा-काॅलेजात डांस करायला लागली... पण हळूहळू याच डांसने तिला महाराष्ट्रात ओळख मिळवून दिली.

या डांसच्या वेडानेच तिला एमबीएतून बीबीए असं उलट शिक्षण घेण्यासंही भाग पाडलं !! 

सुरूवातीला अगदी सातवीत असताना कोजागिरी संमेलनात माधुरीनं आपल्या हौशी कलाकारितेला सुरूवात केली आणि तिथूनच खर्या अर्थानं तिच्या डांसिग करिअरची सुरूवात झाली. त्यानंतर 'दुर्गेश-नंदिनी' या डांसिग ग्रुपच्या माध्यमातून मग ती गावोगावी परफाॅर्म करू लागली.. लोकांच्या वाहवा मिळवू लागली.

'एक -दोन -तीन..' हे माधुरी दीक्षितचं गाणं अक्षरशः तिचं ट्रेडमार्क झालं.

स्टेजला आग लावणारी ही पाॅवर हाऊस माधुरी लोकांच्या तुफान प्रतिसादामुळेच गावोगावी कार्यक्रम करू लागली. आज ती महाराष्ट्राची डांसिंग आयकाॅन ठरली आहे.मात्र तरीही गावोगावी जाऊन आपल्या मातीतल्या माणसांत मिसळत कार्यक्रम करणं ती आजही विसरलेली नाही. यशाच्या उंचीवर पोहोचूनंही आपल्या माणूसकीच्या पायांची मूळं तिनं मातीतून उखडू दिली नाहीत !!

ती एक कसदार आणि परमपदाला पोहोचलेली कलाकार आहे.. हे तिच्या खालील उदाहरणावरून कळेल.
त्याचं झालं असं कि सातार्यात एके ठिकाणी झालेल्या वाघ्या- मुरळीच्या एका डांस दरम्यान माधुरीच्या बांगडीला अनाहूतपणे दिमडी लागली..हातातून रक्त घळाघळा वाहू लागलं..पण माधुरी मात्र नाचतच राहिली..तिच्या रक्तातून डांस वाहत होता तोपर्यंत तिचा मेंदू तिला थांबवू शकत नव्हता..पण शेवटचा ठेका झाला अन ती कोसळली आणि थेट दहा दिवस कोमात गेली.. !
 
तिचं हे डांसचं वेड आणि बेभानपण तिला एक कलावंत म्हणून कुठल्या एनर्जी लेव्हल पर्यंत घेऊन जात असावं..याचा आपण विचार न केलेला बरा !
 
एका टीव्ही शोच्या दरम्यानंही माधुरीच्या नाकाला अशीच दुखापत झाली होती..अनेकवेळा ती धडपडली..पडली..पण प्रत्येकवेळेस नवीन दमसास घेऊन ती स्टेजवर उभी राहिली ..!

तिच्या याच वेडामुळं अभिनेत्री क्रांती रेडकरसारख्या गुणी अभिनेत्रीनंही तिचं कौतुक केलेलं आहे..माधुरीचा डांसिग जलवा पाहून एकदा तर अभिनेता जितेंद्र जोशीनेही तिचे चालू कार्यक्रमात पाय पकडले होते.

माधुरीने काॅलेजला असताना युथ फेस्टिव्हल्सही गाजवली आहेत.

तर संपूर्ण महाराष्ट्राच्या काना-कोपर्यात जाऊन लहान-मोठ्या स्टेजवर जोरदार परफाॅर्मंसही दिले आहेत. बुधवार नाका,शेटफळ,सांगोला ते नाशिक,बदलापूर,वसई इथपर्यंत सर्वच ठिकाणी माधुरीनं आपल्या डांसिग अदाकारीनं रसिकांना मोहिनी घातली आहे. महाराष्ट्र-गोवा,महाराष्ट्र-ओडिशा या दोन सरकारमधील सांस्कृतिक इंटर-अॅक्शन कार्यक्रमांतही तिने आपली कला सादर केली आहे. तिची लावणी अगदी दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचली आहे..आबा सरकून बसा कि नीट,पाहुणं विचार काय हाय तुमचा?,बाई मी लाडाची गं ..या पारंपारिक लावण्या खर्या अर्थानं माधुरीची ओळख ठरलेल्या आहेत. तिच्या याच अफाट डांसिंग क्षमतेमुळं आॅस्ट्रेलियातील मराठी बांधवांनीही तिला तिकडे येण्याबाबत साद घातलेली आहे. 

दरम्यान डांस महाराष्ट्र डांस,मराठी पाऊल पडते पुढे या रिअॅलिटी शो मुळे तिला सर्वदूर ओळख मिळाली आहे. पण तिच्या कष्टाचं खरं चीज झालं..ते अप्सरा आली या झी युवावरील रिअॅलिटी शो मुळे.. तिचं मदमस्तपण तिला या प्लॅटफाॅर्मवर मनसोक्त मांडता आलं ..खुलवता आलं..पोहोचवता आलं आज म्हणूनच ती महाराष्ट्राच्या मनातली अप्सरा झालेली आहे. आज ती शोज करायला महाराष्ट्रभर फिरत असते.. तिचे शोज यत्र-तत्र चालूच असतात..याबदल्यात तिला अनेक पुरस्कारंही मिळाले आहेत.. महाराष्ट्र गौरव स्कार,माणदेशी फांऊडेशनचा उद्योजिका पुरस्कार,स्त्री शक्ती जागर पुरस्कार हे त्यातील काही प्रमुख पुरस्कार आहेत. पण आपल्या कलेवर मनापासून प्रेम करणारे चाहतेच तिला पुरस्कारासारखे आहेत..जे तिची आणि तिच्या कलेची काळजी घेतात..कोणी तिच्यासाठी डिंक लाडू बनवतं तर कोणी तिच्यासाठी फॅटफ्री रेसिपी बनवतं.प्रशांत नावाचा लातूरचा एक चाहता तर तिच्या कार्यक्रमासाठी  कितीही प्रवास करून येतो. सांगोल्यातील शेटफळ नावाचं गाव तर ती गेल्यावर एकत्र होतं..गावकरी तिचा परफाॅर्मंस बघण्यासाठी सांगोल्यातून तुळजापूरला जातात.. मनात असणारी निस्सीम ओढच त्यांना तिथपर्यंत घेऊन जाते .. !!

माधुरीच्या घरी जाताच तिची ट्राॅफींनी भरलेली कपाटं चक्राकार लावलेली दिसतील..बघून चक्कर यावी इतकी ती बक्षीसं आहेत. माधुरीची आई मात्र आपल्या पोरीच्या कर्तबगारीची रोज देखभाल घेत असते..पारितोषकांची रोज सफाई करते..या ट्राॅफ्याच खर्या अर्थाने त्या माऊलीच्या ह्रदयातील अभिमानाचा झेंडा आहे ...! तीच तिची खरी संपत्ती आहे.. आणि याहून मोठी चाहती माधुरीलाही बाहेर कोठे सापडणे मुश्किल आहे. अश्रूंच्या लिक्विडने धुतलेली हसतमुख पारितोषकं आईच्या घरात अशी सदोदितपणे लख्ख चमकत असतात .
माधुरी जरी 'एक दोन तीन' गाण्यावर डिट्टो माधुरी दीक्षित सारखी थिरकत असली तरीही तिच्या आवडीची अभिनेत्री मात्र श्रीदेवी आहे.. तिचं लाडिक आणि हट्टी हसणं माधुरीला संमोहित करतं..श्रीदेवीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच माधुरी आज डांसचे धडे घेत आहे.. अर्थातच श्रीदेवीची डांसमधील फेशिअल एक्सप्रेशन्स तिच्यासाठी अभिनय क्षेत्रासाठी जमेची ठरत आहेत. 'गाग्रा ' नावाचा एक वैदर्भीय सिनेमा तसेच फांजर नावाचा मराठी सिनेमाही तिने केलेला आहे.त्याचबरोबर आगामी इर्सल,पारधा नावाच्या सिनेमांत तिने एक -एक आयटम साँग ही केले आहे. 

सिनेमात जाऊन तिला आता गुण-संपन्न अभिनेत्री होण्याचे वेध लागले आहेत .. साऊथ मूव्हीजसाठीही ती अॅप्रोच झाली आहे.. तिचं त्यासाठीचं धडपडणंही सुरूच आहे. खरंतर हिपहाॅप ,बॅले सारख्या पाश्चात्यवादी डांस प्रकारात माधुरी रमत नाही.. लावणी,सवाल-जवाब या मूळातल्या लोककलेशी ती कधीचीच एकरूप झाली आहे..याच मूळातल्या कलेतून ती मातीतल्या माणसांशी संवाद साधत असते.. स्टार पदावर जाऊनही ती गावोगावीच्या छोट्या स्टेजना कधीच विसरली नाही. पण आजही डांस वल्गरनेस च्या कह्यातून सुटलेला नसल्याची तिला खंत आहे . त्यातच स्त्री असणं हा मुदलातच एक वेगळा संघर्ष आहे. पण माधुरीला त्याचं भांडवल करणंही आवडत नाही. मुलींनी या सर्वांवर मात करून पुढं यायला हवंय..संघर्ष करण्यात काही नावीन्य नसल्याचेही तिचं एकूण मत आहे. समाजानेही आपला लघुकोन विशालकोनात परिवर्तित करायला हवाय.
कारण शेवटी माधुरीची कला आणि तिचं स्त्री असणं या दोन्ही समान संघर्षाच्या गोष्टी आहेत.. माधुरीला घरातून मानसिक पाठिंबा आहे..घरच्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता माधुरी कला क्षेत्रात भक्कमपणे टिकून आहे..टिकून नाही तर रमूनदेखील आहे.. !

पण एखाद्या नवोदित कलावंत मुलीचा स्त्री असण्याचा संघर्ष कलाकारीतेवर भारी पडू नये ,हीच माफक अपेक्षा आहे. आपल्यापुढे लावणीसम्राज्ञी मंगलाताई बनसोडे,विठाबाई नारायणगांवकर अशी बडी नांव आहेत. त्यांनी या क्षेत्रात अफाट नाव कमवलंय..पण कलेचा आंतरिक शाप त्यांनीही भोगलाय. माधुरीच्या घराचा संघर्ष थांबो..तिच्यासारख्या कलावंताचं म्हातारपणीचं कुढत जगणंही थांबो यासाठी सरकारनेही लक्ष घालायला हवंय. तरच या कलेला उःशाप मिळेल...!

माधुरी ज्वानीच्या आगीची मशाल हाती घेऊन आज गावोगावी लढत -पेटत आहे .. ती स्टेजला दिवसेंदिवस अधिकच आग लावत चालली आहे ..अर्थातच धुरकट वासनेची झालर पांघरलेलं धुकं आपल्या आसपास पसरलेलं असलं तरीही तिचं बेभानपण तिला या द्वैताकडून उच्चकोटीच्या अद्वैताकडे कधीचंच घेऊन गेलेलं आहे !!

जियो माधुरी ..

 सचिन सकुंडे
(9021050475)