Your Own Digital Platform

सातारा जिल्हा बँक बँको पुरस्काराने सन्मानित


स्थैर्य, सातारा : बँकिंग क्षेत्रातील उल्लेखनिय संस्था बँको ने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला बेस्ट परफॉर्मन्स व बेस्ट टेक्नॉलॉजी असे दोन पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. सदर पुरस्कार केंद्रीय वैधानिक लेखापरिक्षक श्री. शरद भागवत यांचे हस्ते प्रदान करणेत आले. बँकेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, अधिकारी श्री .दिलीप जाधव व श्री .सुनिल शिंदे यांनी पुरस्काराचा स्वीकार केला . बँको पुरस्कार मिळालेबद्दल बँकेचे जेष्ठ संचालक व विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, बँकेचे अध्यक्ष श्रीमंत छ .शिवेंद्रसिंहराजे भोसले, उपाध्यक्ष श्री .सुनिल माने, सर्व संचालक व सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांचे अभिनंदन केले.

बँको, देशभरातील जिल्हा बँका, अर्बन बँका, ग्रामीण बँका या सहकारी क्षेत्रातील बँकांचे कामाचे मुल्यमापन बँकोचे ज्युरीमार्फत करुन दरवर्षी विविध पुरस्काराने सन्मानित करते . दरवर्षी सातारा जिल्हा बँक बँको पुरस्कार मिळवीत आहे . यावर्षी दि .०४/०२/२०२० रोजी रिओ रेस्टो आर्पोरा, गोवा येथे बँको पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

जिल्हा बँकेला बेस्ट परफॉर्मन्स व बेस्ट टेक्नॉलॉजी या दोन कॅटेगरीतील पुरस्काराने सन्मानित करणेत आले आहे. बँकेने राखलेला शुन्य टक्के एन .पी .ए ., १००% कर्जवसुली, उत्तम व्यवस्थापन, नाबार्ड व आर .बी .आय . चे नियमांचे काटेकोर पालन तसेच बँकींग व्यवसायातील विविध रेशो बँकेने राखले आहेत . याबाबत मुख्य अतिथी व बँको व्यवस्थापनाने बँकेचे कौतुक केले . तसेच बेस्ट टेक्नॉलॉजी कॅटेगरीत बँकेने सी .बी .एस .प्रणाली, मोबाईल बँकिंग, किसान पे अॅप, भिम अॅप ग्राहकांना देवून क्रांती केली आहे असे नमूद केले.

यावेळी कार्यक्रमाचे मुख्य अतिथी श्री .शरद भागवत म्हणाले, सह .बँकांनी आर .बी .आय . चे बंधनांची भिती न बाळगता आर .बी .आय .चे निकष समजावून घेवून त्याची अंमलबजावणी करावी, त्यातून सह .बँकांचे व्यवस्थापन व आर्थिक स्थिती सुधारणेस मदत होईल . तसेच एच .डी .एफ .सी . सारख्या बँकेप्रमाणे रिटेल बँकींग व्यवसायातून मोठी बँक होणेचे स्वप्न सहकारी बँकांनी उराशी बाळगावे व त्याप्रमाणे छोटया बँकेचे मोठया बँकेत रुपांतर करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. ग्राहकांशी सदैव संपर्क ठेवून ग्राहकांना नविन काय हवे आहे याचा शोध घेतला पाहीजे व जलद सेवा पुरविली पाहिजे . तसेच सहकारी बँकातील कर्मचा-यांना अद्यावत प्रशिक्षण देणेची गरज असलेचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी देशभरातील पाचशेहून अधिक सह .बँकांचे चेअरमन, मुख्य कार्यकारी अधिकारी, बँको व्यवस्थापनाचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर व बँकेचे अधिकारी श्री .डी .एन .जाधव व श्री .एस .एस .शिंदे उपस्थित होते . बँको पुरस्कारासाठी देशभरातील ५५० सह .बँकांनी सहभाग घेतला होता.