Your Own Digital Platform

रस्ते अपघात थांबवण्यासाठी


जगभरातील जवळपास दीड ते दोन हजार नामवंत कलाकार, खेळाडू, उद्योजक, साहित्यिकांचा मृत्यू रस्ते अपघातात झाला आहे. अरुण सरनाईक, शांता जोग, भक्ती बर्वे, आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसेंसारख्या मराठी कलाकारांचा मृत्यूही रस्ते अपघातातच ओढवला आहे. मागील आठवड़यातच हिंदीतील ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या वाहन चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात त्या जखमी झाल्या. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. शबाना आझमी यांच्या अपघातानंतर पुन्हा एकदा रस्ते अपघात आणि त्याची तीव्रता चर्चेत आली आहे. पुन्हा एकदा महामार्गावरील अपघातास कारणीभूत असणा-या वाहन चालकांचा निष्काळजीपणा समोर आला आहे. जानेवारीच्या पहिल्या पंधरवड़यात दरवर्षी वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने वाहतूक सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. याद्वारे सर्व प्रकारच्या वाहन चालकांचे प्रबोधन, वाहतुकीचे नियम सांगणे, चालकांची आरोग्य तपासणी, मद्यप्राशन करून वाहन न चालवण्याविषयीचे आवाहन आदींबाबतची जनजागृती दरवर्षी केली जाते. तरीही चालकांचा निष्काळजीपणा, नादुरुस्त वाहने, लवकर पुढे जाण्याची स्पर्धा, वाहनाचा अंदाज न येणे आदी कारणांसोबतच आठ तासांपेक्षा अधिक काळ सलग वाहन चालवणे, अशा अनेक कारणांनी दरवर्षी रस्ते अपघातात हजारो प्रवासी आपला जीव गमावतात. जानेवारी ते डिसेंबर 2019 या कालावधीत ‘एक्स्प्रेस वे’वरील 74 अपघातांमध्ये 92 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. वर्षभरातील अपघातांची एकूण संख्या 306 आहे. सर्वाधिक अपघात रायगड विभागात झाले असून, मृतांची संख्याही याच विभागात अधिक आहे.

एकूण अपघातांमध्ये पुरुषांचे प्रमाण जास्त आहे. या अपघातांमध्ये 70 पुरुष, तर 22 महिलांचा मृत्यू ओढवला आहे. गंभीर जखमींमध्ये 124 पुरुष व 38 महिला, किरकोळ जखमींमध्ये 28 पुरुष व 3 महिला अशी आकडेवारी आहे. अपघात होऊनही दुखापत न झालेल्या प्रवाशांची संख्या 138 आहे. रायगडनंतर पुणे, नवी मुंबई व त्यानंतर पिंपरी-चिंचवड विभागात अधिक अपघात झाले आहेत. रस्ते अपघातात दरवर्षी किमान काही हजार नागरिक आपला जीव गमावतात. या मृत्यूला फक्त गाडीचा वेग वा अनियंत्रित चालक हे कारण नाही, तर या बरोबरीनेच रस्त्यांची दुरवस्था, रस्त्यावर मोठ़या प्रमाणात असलेले खड्डे, वर्षानुवर्षे सुरू असणारी रस्त्यांची कामे, एकाचवेळी दोन्ही बाजूने उखडण्यात आलेले रस्ते, कामासाठी आवश्यक असणारे अन् रस्त्यातच अस्ताव्यस्त पसरलेले डेब्रिज, राडारोडा आणि कामगारांची वर्दळ, योग्य सूचना फलकांचा अभाव, रात्रीच्या वेळी रस्त्याचे काम सुरू असल्याबाबतची कोणतीही सूचना न देणे, अशा अनेक कारणांचा समावेश या अपघातांमागे आहे. मुंबईतले मुख्य रस्ते आणि उपनगरांना जोडणारे रस्ते यांची कामेही विविध महानगरपालिकांच्या अखत्यारीत सुरू आहेत. या रस्त्यांनीही आजवर हजारो निष्पाप प्रवाशांचा बळी घेतला आहे. ज्यांचा बळी गेला आहे, त्यांच्या नातेवाइकांकडे माणुसकीच्या नात्याने साधी विचारपूस करण्याचे औदार्यही ना पालिका प्रशासनाकडून दाखवण्यात येते, ना स्थानिक लोकप्रतिनिधींकडून. खड्डेमय रस्ते वा खड्ड़यात गेलेले रस्ते सध्या अवघ्या महाराष्ट्रात अनुभवायला मिळतात.

अपघाती रुग्णांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारी दोन महत्त्वाची कारणे म्हणजे अपघातानंतरच्या पहिल्या तासात ज्याला ‘गोल्डन अवर’ असे म्हटले जाते, त्या तासात उपचार न मिळणे व अपघात झाल्यावर लगेचच जागेवर रुग्ण जिवंत ठेवण्यासाठीचे प्राथमिक वैद्यकीय उपचार न मिळणे आदी उपाययोजना न होणे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाला अत्यवस्थ रुग्ण रुग्णालयात नेईपर्यंत त्याचा जीव वाचवण्यासाठीचे मूलभूत ज्ञान देणे आवश्यक आहे. हे वाटते तितके अवघड नाही, पण ते होणे गरजेचे आहे. भारतात अपघातानंतर 50 टक्के रुग्णांचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू होतो. आपल्याकडे अपघात झाल्यास घटनास्थळावर सर्वप्रथम बघ्यांची गर्दी होते. त्यानंतर पहिला रोल हा डॉक्टरांचा नाही, तर पोलिसांचा येतो ही शोकांतिका आहे. ब-याचदा कायदेशीर बाबींच्या पूर्ततेसाठी किंवा भीतीपोटी तासन्तास अपघातातील रुग्ण मदतीशिवाय रस्त्यावरच तडफडत असतात.

ग्रामीण वा शहरी भागात या रुग्णांना सरकारी रुग्णालयांमध्ये नेऊन सोडले जाते, जिथे डॉक्टर उपलब्धच नसतात. विशेष म्हणजे रस्ते अपघातात बळी पडलेल्या मृत्यूंची जबाबदारी कोणी घ्यायची, हा प्रश्न उरतोच. आजवर याकडे प्रशासन आणि कायद्यानेही गांभीर्याने पाहिलेले नाही. वाहतुकीचे पद्धतशीर नियोजन करणे, रस्ते दुरुस्ती करणे, खड्डेदुरुस्तीला प्राधान्य देणे आणि वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळणे या उपाययोजना अत्यावश्यक ठरत असताना त्याकडेच दुर्लक्ष होत असल्याचे पुन्हा पुन्हा समोर येते आहे. यासाठी प्रभावी रस्ते अपघात प्रतिबंधात्मक धोरणे आखली पाहिजेत. रस्ते अपघाताच्या धोक्याला आळा घालायचा असेल, तर सार्वजनिक वाहतूक सुरळीत व सक्षम करणे हा उत्तम उपाय आहे. मात्र नेमके याकडेच दुर्लक्ष झाल्याचे दिसते.
***