Your Own Digital Platform

साखरवाडी भागातील ओढ्यातील अवैधपणे वाळूचा उपसास्थैर्य, सातारा : वाळू माफिया साखरवाडी भागातील ओढ्यातील अवैधपणे वाळूचा उपसा करील असल्याचे उघडकीस येत आहे. अनेकदा शेतकऱ्यांनी वाळू चोरीबाबत तलाठी व मंडकाधिकारी यांच्याकडे तक्रारी करूनही याकडे महसूल प्रशासन सोयीस्कररित्या दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांच्या मध्ये संतापाचे वातावरण आहे.
फलटण तालुक्यात तसेच साखरवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु असल्याने सध्या वाळूला चढा भाव आला आहे. जिल्हा प्रशासनाने वाळूचा ठेका बंद करुन वाळू उपशावर बंदी घातली आहे. त्यामुळे वाळूमाफिया फलटण तालुक्यात विविध ठिकाणांहून अवैधपणे वाळूचा उपसा करीत आहेत. ताबे वस्ती बिरोबा मंदिर जवळ व जोशी वस्ती लगतच्या ओढयातून दिवसाढवळ्या व रात्री मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जात आहे. वाळूचा तुटवडा असल्याने वाळू माफियाकडून शेतकऱ्यांना दमदाटी करून या ओढ्यातील वाळू नियमबाह्यपणे उपसा करून चढ्या भावाने विकली जात आहे.

ओढ्याचे पात्रांमधून गेल्या दोन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरु आहे. साखरवाडी भागात रात्रंदिवस हायवा व ट्रॉलीने अवैध वाळूची वाहतूक होत आहेत.वाळू उपशामुळे येथील परिसरातील रस्त्यांची व ओढयालगत असळणाऱ्या शेतीची दुरवस्था झाली आहे. याबाबत अनेकवेळा संबंधित विभागांकडे तसेच तलाठी व मंडलाधिकारी यांच्याकडे तक्रार देऊनही कोणतीही कारवाई होत नाही. यामुळे यामध्ये मोठ्या अर्थपूर्ण तडजोडी होत असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत महसूल, पाटबंधारे, पोलिस व ग्रामपंचायत प्रशासन एकमेकांकडे कारवाई करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालण्याची मागणी... प्रशासनाच्या या हतबलतेमुळे वाळू माफिया मात्र फोफावले असून आता याबाबत जिल्हा स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच लक्ष घालण्याची गरज आहे. विविध भागातील ग्रामपंचायती किंवा संबंधित शेतकरी यांच्याकडून अनेकदा संबंधित विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या असताना याकडे महसुल विभागही डोळे असुन आंधळ्याची भूमिक घेऊन बसले आहे. यामुळे वाळुमाफियांचे पैशाच्या व मनगटाच्या बळावर वर्षभरापासून पेव फुटले आहे. महसूल व पोलिस विभागकडूनच या उपशाला छुपा पाठिंबा असल्याचे बोलले जात असल्याने शासकीय मालमत्तेचे लूट होत आहे. सर्वसामान्य ग्रामस्थ व शेतकऱ्यांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत आता नुकतेच जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारले जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी लक्ष घालण्याची गरज व्यक्त होत आहे.

महसूल विभागाचे पथक नावालाच
 शासनाचा महसूल बुडवून अवैध गौण खनिजाची चोरी करणा-यावर कायदेशीर कारवाई करण्यसाठी प्रशासनाने महसूल विभागाची स्वतंत्र पथके तयार केली आहेत. फलटण तालुक्यात व साखरवाडी परिसरात अनेक दिवसांपासून वाळू उपसा करून अवैधरित्या चोरटी वाहतूक सुरु आहे. मात्र यावर काहीच कारवाई होत नसल्याने महसूल विभागाची पथके नावालाच आहेत की काय असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.