Your Own Digital Platform

फलटण संस्थान हेरिटेज संगीत महोत्सव उत्साहात संपन्न

स्थैर्य, फलटण : बासरी वादक अमर ओक आणि ख्यातनाम गायक राजेश दातार यांचे स्वागत करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर. दुसर्‍या छायाचित्रात कार्यक्रमाप्रसंगी अदाकारी सादर करताना राजेश दातार व अमर ओक

स्थैर्य, फलटण : दिनांक 26 जानेवारी, फलटण येथे मुधोजी हायस्कूल, फलटणच्या रंगमंचावर पहिला फलटण संस्थान हेरिटेज संगीत महोत्सव श्रोत्यांच्या प्रचंड उत्साहात आणि विक्रमी उपस्थिती मध्ये संपन्न झाला. गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सची प्रस्तुती असलेल्या या सोहळ्यात जगप्रसिद्ध बासरी वादक अमर ओक आणि ख्यातनाम गायक राजेश दातार या दिग्गज कलाकारांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.

दिप प्रज्वलन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर , ज्येष्ठ संगीत गुरु मीनाताई बर्वे, प्राचार्य विश्वासराव देशमुख इत्यादी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यानंतर केतकी वाडेकर हिच्या अभ्यासपूर्ण कथक सादरीकरणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यांनी गणेश वंदना सादर करुन त्यानंतर नृत्यातून एक कथा पेश केली. उत्कृष्ट पदलालित्य आणि कथानुरुप अभिनयाने रसिकांची मने जिंकली. यानंतर स्वर मंचावर आलेल्या भाग्यश्री गोसावी यांनी श्री श्री रविशंकर यांच्या भूप रागावर आधारित हरी सुंदर नंद मुकुंदा हे भजन सादर करुन रसिकांची वाहवा मिळवली आणि नंतर अवघे गरजे पंढरपूर हा अभंग सादर करुन मैफिल एका टप्प्यावर नेऊन ठेवली. आशिष देशपांडे यांनी तबल्याची उत्तम साथ करत रंग भरले. नंतर अमर ओक यांनी बासरीवर मधुवंती राग सादर केला आणि श्रोत्यांच्या मनाची पकड घेत अनेक प्रसिद्ध धून बासरीवर सादर केल्या, त्यापैकी मालगुडी डेज आणि  ठ रेहमान यांनी संगीतबद्ध केलेल्या काही रचनांना विशेष दाद मिळाली. अभिजित जायदे यांच्या तबल्यावरील साथीने बहार आणली. राजेश दातार यांनी प्रथम तुज पाहता या नाट्यपदाने दमदार सुरवात केली. रसिकांच्या आग्रहास्तव आपल्या खास शैलीत मधूबन मे राधिका हे गीत आणि कानडा राजा हा अभंग पेश केला. यावेळी त्यांच्या आणि बासरीच्या जुगलबंदीने हा सोहळा आनंदाच्या परमोच्च बिंदूवर पोहचला. लागा चुनरिमे दाग या भैरवीच्या अनेक वन्स मोअर च्या गजरात मैफिलीची सांगता झाली. त्यांना शुभदा आठवले यांनी हार्मोनियम वर आणि महेश जोजारे यांनी पखवाज वर समर्पक साथ केली. फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल आणि श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी श्रीकांत पत्की, श्रद्धा किरकिरे आणि श्री.भोसले यांच्या साथीने गायलेली छत्रपती शिवाजी महाराजांची आरती विशेष आकर्षण ठरली. या महोत्सवाचे आयोजन केलेल्या कला प्रसारक संस्थेने प्रचंड प्रतिसादाबद्दल प्रेक्षकांचे आभार मानत पुढील वर्षाचे आमंत्रण दिले. मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर  यांनी अशा प्रकारच्या शास्त्रीय मैफिलीची गरज आनंदी आणि आरोग्यदायी जीवनासाठी असल्याचे नमूद करीत हा उत्सव पुढे वाढत जाईल असा विश्वास व्यक्त केला. सुप्रसिद्ध निवेदक श्री.संजय भुजबळ यांचे निवेदन हे ही या महोत्सवाचे खास आकर्षण ठरले. या सोहळ्याचे सहप्रयोजकत्व शांतिकाका सराफ, बुलडाणा अर्बन, एल.आय.सी. युनिटी बिल्डर्स, जोशी हॉस्पिटल, शिव मोबाईल्स, दिशा अकादमी, बोरावके ऑटो, ग्लेक्सी बँक, विसावा हॉटेल यांनी स्वीकारले होते. फलटण एज्युकेशन सोसायटीने हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली. यावेळी विविध संस्था पदाधिकारी, नागरिक, बंधू भगिनी व पत्रकार बंधू उपस्थित होते.