Your Own Digital Platform

तेच तेच नाटक


शाहीनबाग येथे नागरिकत्व कायद्याच्या विरोधात कोणी बंदुकधारी पोहोचल्यानंतर लगेच आम आदमी पक्षातर्फ़े भाजपाचा हल्लेखोर म्हणून आरोप झाला. तेव्हाच ह्यात बहुधा ‘आप’चा हात असल्याची शंका आलेली होती. कारण केजरीवाल यांचा हा इतिहास आहे. आजपर्यंत अनेक अशा घटना घडलेल्या आहेत, ज्यामध्ये त्यांच्याच कोणीतरी उचापती केलेल्या आहेत आणि विनाविलंब त्यांनी भाजपावर बेछूट आरोप केलेले होते. पुढे जेव्हा अशा संशयिताला अटक होऊन चौकशी झाली, त्यात हा आरोपी आम आदमी पक्षाचाच सदस्य वा अनुयायी असल्याचे निष्पन्न झालेले आहे. कालपरवाही अशी घटना अनपेक्षित होती आणि घडली. तर तात्काळ त्यावरून काहूर माजवण्यात सर्वात आघाडीवर केजरीवाल यांचेच सहकारी असावेत हा योगायोग नव्हता. म्हणून तर प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर पक्षाचे प्रवक्ते व खासदार संजय सिंग यांनी पुराव्यांचा इन्कार करण्यापेक्षा ते माध्यमांना मिळालेच कसे; म्हणून कांगावा सुरू केला. यातला बेशरमपणा समजून घेतला पाहिजे. ही मंडळी कुठून राजकीय क्षेत्रात आली? तर सत्य लोकांना कळले पाहिजे आणि म्हणूनच माहितीचा अधिकार हा मुद्दा घेऊन यांची चळवळ सुरू झाली होती. आज तेच आव्हान कशाला देत आहेत? माहिती वा पुरावे बाहेर कुठून आले? पुरावे कशाला समोर आले? सत्य हेच ज्यांचे ब्रीद असते, त्यांना सत्य कुठून वा कोणी समोर आणले; याच्याशी कर्तव्य नसते. तर सत्याशी कर्तव्य असले पाहिजे. पण सत्य आपल्या विरोधात गेले, मग आम आदमी पक्षाचा चेहरामोहरा एकदम बदलून जात असतो. संजय सिंग म्हणूनच कांगावा करीत आहेत. त्यांची कसरत सत्य दडपण्यासाठी चालली आहे. त्यामुळेच आपण अशा काही गोष्टींच्या प्रतिक्षेत असल्याचा दावा त्यांनी केला. कारण सत्याला सामोरे जाण्याइतकी हिंमत आता ते गमावून बसले आहेत. काही महिन्यांपुर्वी झालेले असेच नाटक जनता विसरून गेली असेच त्यांना वाटत असावे.एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणूक ऐन रंगात आलेली होती आणि दिल्लीत आम आदमी पक्षाच्या आतिषी मार्लेना उमेदवार होत्या. त्यांच्या विरोधात कोणीतरी आक्षेपार्ह मजकूर असल्याचे पत्रक वाटलेले होते. तर त्याची चौकशी होईपर्यंतही ही मंडळी थांबलेली नव्हती. आपल्या विरोधात बदनामीकारक हे पत्रक भाजपाचे उमेदवार व क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनीच वाटले असल्याचा गवगवा त्यांनी केलेला होता. त्यावर पोलिस तक्रार करूनही त्यांचे समाधान झालेले नव्हते. आतिषी यांनी आपल्या पक्ष सहकार्‍यांसह पत्रकार परिषद घेतली आणि कॅमेरापुढे अश्रू ढाळून सहानुभूती मिळवण्याचे छान नाटक रंगवले होते. पुढे त्या प्रकरणाचे काय झाले? मतदान होऊन त्यांचा दणदणित पराभव झाला आणि आपवाले व मार्लेना सगळी बदनामी जणू विसरून गेले. हा प्रकार नित्याचा झालेला आहे. लोकपाल आंदोलनातून राजकारणात आलेल्या या टोळीने भारतीय राजकारणाला नवी दिशा देणार असा आव आणलेला होता. भ्रष्टाचाराच्या दलदलीतून राजकारण बाहेर काढायला आलेल्या या भामट्यांनी इथले जुने मुरलेले पक्षही बदमाशी करणार नाहीत, इतके भ्रष्ट आचरण राजकारणातली नित्याची बाब करून टाकली. कारण अवघ्या सहासात वर्षाच्या कारकिर्दीत असले नाट्यमय प्रकार हा आम आदमी पक्षाचा राजकीय कार्यक्रम होऊन गेला. अशी डझनावारी नाटके झालेली आहेत. किंबहूना कांगावखोरी हे या पक्षाने राजकीय तत्वज्ञान करून टाकलेले आहे. त्याचे एकाहून एक मोठे आदर्शच त्यांनी उभे करून ठेवलेले आहेत. जंतरमंतर येथे धरण्याला बसलेले योगेंद्र यादव यांच्या तोंडाला काळे फ़ासणारा तरूण आठवतो कोणाला? मंचाच्या मागल्या बाजूने समोर आलेल्या या तरूणाने यादव यांच्या तोंडाला शाई फ़ासली होती आणि तो सगळा प्रकार कॅमेराच्या कोनात नेमका टिपला जाईल, याची काळजी घेतली होती.शाई अंगावर फ़ेकणे वा तोंडाला फ़ासणे, ही आम आदमी पक्षाची खासियत होऊन गेली. त्या जंतरमंतरच्या घटनेनंतर यादव कित्येक तास आपले माखलेले काळे तोंड घेऊन माध्यमांना सविस्तर मुलाखती देत होते. पण आपले तोंड धुवावे अशी सदबुद्धी त्यांना झाली नव्हती. पुढे पोलिसांनी त्या तरूणाला शोधून काढले आणि आरोपी हाती लागल्यावर या टोळीची पळता भूई थोडी झालेली होती. कारण काळे झालेले तोंड दाखवून सहानुभूतीचा वाडगा फ़िरवणार्‍याला प्रक्षेपित करण्यात माध्यमांना जितका उत्साह असतो, तितका आरोपी पकडल्यावर त्यातले सत्य सांगण्याची इच्छाही पत्रकारांना नसते. पण यादव यांचे तोंड माखणारा तो तरूण बाहेरचा परका नव्हता, की हल्लेखोरही नव्हता. तो आपचाच कार्यकर्ता असल्याचे नंतर निष्पन्न झाले. पण तेव्हा दिल्लीकर माध्यमांनी सुपारी केजरीवालांची घेतली असल्याने पुढल्या चौकशीचे तपशील व बातम्या बासनात गुंडाळल्या गेल्या. नेहमी असेच झालेले आहे. मग लोकांना सत्य शोधण्यासाठी सोशल मीडियातून शोधाशोध करावी लागत असते. असाच प्रकार केजरीवाल यांना वाराणशीत मोदींना हरवायला गेल्यावर करावा लागला होता. तिथेही त्यांच्या मिरवणूकीत घुसून कोणी काळी शाई अंगावर टाकलेली होती. तात्काळ भाजपावर आरोप सुरू झाले आणि मनकर्णिका घाटावर केजरीवाल मौनव्रत धारण करून बसले. त्यांचे सहकारी भाजपावर आरोप करीत मोकाट सुटलेले होते. हा गेल्या सहासात वर्षातला खाक्या झाला आहे. त्याचा आता लोकांनाही कंटाळा आलेला आहे. पण केजरीवाल कंपनीला मात्र आपले जुने नाटकच अजून लोकप्रिय असल्याच्या समजूतीतून बाहेर पडता आलेले नाही. आपल्याच कुणाला पाठवून आपल्यावरच हल्ले करून घ्यायचे आणि तात्काळ भाजपा वा अन्य कुठल्या पक्षावर आरोपांची सरबत्ती सुरू करायची; ही त्यांची मोडस ऑपरेन्डी झालेली आहे.२०१३ च्या विधानसभेत दुसर्‍या क्रमांकाच्या जागा जिंकल्यावर मुख्यमंत्री होण्यासाठी कॉग्रेसने देऊ केलेला पाठींबा घ्यावा किंवा नाही, म्हणून वॉर्डातील जनतेच्या सभा घेऊन कौल मिळवणार्‍या केजरीवालांना आता जनता आठवतही नाही. कुठल्या जनतेला कौल विचारण्याची गरज वाटत नाही. गेल्या पाच वर्षात त्यांच्या मंत्रीमंडळातील चार मंत्र्यांना विविध गुन्ह्याचे खटले सुरू झाले म्हणून बडतर्फ़ करावे लागले आहे. पण एकदाही त्यांची मान शरमेने खाली गेल्याचे कोणी बघितलेले नाही. कुणा महिलेला रेशनकार्ड देण्यासाठी यांचा संदीपकुमार नावाचा मंत्रीच लैंगिक शोषण करीत असल्याची क्लिप मिळाली असतानाही केजरीवाल यांनी महिनाभर त्याची पाठराखण केली होती. पुढे ती क्लिप माध्यमांपर्यंत पोहोचल्याचे कळताच त्याची पक्षातून व मंत्रीमंडळातून हाकालपट्टी केली होती. पण एकदाही त्यांनी कुणासमोर शरमेने मान खाली घातली नाही. शिसोदिया वा संजय सिंग यांना ते ‘डर्टी पिक्चर’ उघड्या डोळ्यांनी बघायची हिंमत कधी झाली होती काय? आज कपिल भैसला या बंदुकधारी संशयिताचे फ़ोटो पोलिसांनी जगजाहिर केल्यावर त्यात भाजपाच्या डर्टी ट्रिक्स डिपार्टमेन्टचा हात संजय सिंग बघू शकतात. पण आपल्या पक्षातले नेते मंत्री जे उद्योग करतात, त्यातली घाण त्यांना बघता आलेली नाही. गेल्या विधानसभा निवडणूकीच्या दरम्यानही असाच प्रकार घडलेला होता. केजरीवाल गळ्यात हार घालून जिपवरून मतदारांचे अभिवादन घेत फ़िरत होते. त्यांच्या जिपवर एक तरूण चढला व त्याने केजरीवालांना हार अर्पण केला होता. मग तात्काळ त्यांच्या कानशीलात सणसणित भडकावली होती. त्याचे प्रायश्चीत्त म्हणून केजरीवाल आधी राजघाटावर गेले आणि नंतर त्या हल्लेखोराच्या भेटीलाही गेले होते. तोही भाजपा वा कॉग्रेसचा निघाला नव्हता, तर आम आदमी पक्षाचा कोणी स्वयंसेवक निघाला होता. हे निव्वळ योगायोग नसतात. त्यालाच मोडस ऑपरेन्डी म्हणतात.

गुन्हेगाराची एक शैली असते. त्यांची जी पद्धत असते, त्याला पोलिस तपासात मोडस ऑपरेन्डी म्हणतात. आप हा पक्ष राजकारणात गुन्हेगारी शैली घेऊन आलेला आहे. अण्णा हजारे यांनी लोकपाल आंदोलकांना राजकारणामध्ये पडायला विरोध केला होता. राजकारण हा चिखल असल्याचे म्हटले होते. तर तो चिखल साफ़ करण्यासाठी त्या चिखलात उतरावे लागेल, असे केजरीवालांनी अण्णांना सांगितले होते. पण चिखल आपल्याला अंगभर माखून घ्यायचा आहे, किंवा त्यातच डुंबायचे आहे, असे त्यांनी अण्णांना कधी सांगितलेले नव्हते. प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी ते करून दाखवलेले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात देशामध्ये शेकडो राजकीय पक्ष व नेते आलेले आहेत. त्यांनी विविध गैरप्रकार केलेले असतील. पण गुन्हेगारी शैलीनेच राजकारण खेळण्याचा अट्टाहास, आम आदमी पक्षाइतका अन्य कोणी केलेला नसेल. आपणच गुन्हा करायचा. मग त्यावरून कांगावा आणि बोंबा ठोकायची शैली यांचीच खासियत आहे. दुसर्‍यांवर बेछूट आरोप करण्याने सनसनाटी माजवणार्‍या केजरीवाल यांनी मधल्या काळात कोर्टाच्या पायर्‍या झिजवायला लागल्यावर घाऊक दराने माफ़ीनामेही लिहून दिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून कुठल्याही सभ्यतेची कोणी अपेक्षाही करू शकत नाही. मात्र अशा नाटकांनी त्यांच्या गुणांपेक्षा अवगुणांवर अधिक अवलंबून रहाणे त्यांना सार्वजनिक जीवनातून उठवू शकते, हे त्यांनी विसरू नये. ज्या अण्णांना साधूसंत म्हणून पेश करून केजरीवाल यांनी आपले दुकान मांडले, त्या अण्णांनी सध्या मौनव्रत धारण केलेले आहे. पण त्यांची साधी बातमीही देण्याचे सौजन्य कुठल्या माध्यमाने दाखवलेले नाही. त्यामुळे माध्यमांच्या प्रसिद्धीवर राजकारण खेळणार्‍यांना हीच माध्यमे दुर्लक्षित करून संपवू शकतात, हे त्यांनी लक्षात ठेवलेले बरे. सनसनाटी तात्पुरती चालू शकते. पण कसोटीची वेळ आल्यावर गुणवत्तेला पर्याय नसतो. कारण उलटा चोर कोतवालको डांटे, ही म्हण आहे. ती कारभाराची शैली वा पद्धत असू शकत नाही.


भाऊ तोरसेकर
जगता पहारा