Your Own Digital Platform

घरफोडीचा छडा लावण्यात यश , अल्पवयीन मुलासह चार जणांना अटक


स्थैर्य, सातारा : सातारा शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाला डिसेंबर 2019 मध्ये दत्तनगर, कोडोली (ता. सातारा) येथे झालेल्या घरफोडीचा छडा लावण्यात यश आले. याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह चार जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून साडेआठ तोळ्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 24 डिसेबर 2019 मध्ये दत्तनगर, कोडोली, ता. सातारा येथील ज्योती प्रकाश नवलडे यांच्या घराची अज्ञात चोरटय़ाने घरफोडी करून सुमारे 3 लाख रूपये किमतीचे घरातील सुमारे साडेनऊ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले होते. त्यामध्ये मोहनमाळ, राणीहार, चेन, कानातील झुबे, वेल, टॉप्स याचा समावेश होता. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर अज्ञात चोरटय़ांच्या विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. त्याबाबत सहाय्यक पोलीस अधिक्षक समीर शेख, सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक एन. एस. कदम यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने सातारा शहर परिसरात पेट्रोलिंग करुन बातमीदाराशी वेळोवेळी संपर्क साधून त्याच्याकडून गोपनीयरित्या या गुन्हयातील चोरटय़ांची माहिती मिळवत त्यातील एका संशयितास ताब्यात घेतले. तो अल्पवयीन असल्याचे समजतास त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने व त्याच्या मित्रांनी हा गुन्हा केल्याचे मान्य केले. त्याचे मित्र निशांत संजय अडागळे (वय 19, रा. चिंचणेर स. निंब ता. सातारा) व महेश हणमंत धनवडे (वय 26, रा. साई मंदीरजवळ गोडोली सातारा), निकेश अंकुश साठे (वय 23, रा. जाधव कॉलनी कोडोली ता. सातारा) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता निशांत संजय अडागळे याने व त्याचे साथीदार महेश हणमंत धनवडे यांच्याकडून गुन्हय़ातील चोरीस गेलेले सोन्याचे झुबे, वेल, टॉप्स असे सुमारे दीड तोळयाचे सोन्याचे दागिने व निलेश अंकुश साठे याच्याकडून एक मोहनमाळ, एक राणीहार असे 7 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असे एकूण साडेआठ तोळे वजनाचे 3 लाख रुपये किमतीचे दागिने संशयित पोलीस कोठडीत असताना हस्तगत करुन हा गुन्हा उघडकीस आणला आहे. या कारवाईत पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख तसेच सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे, प्रशांत बधे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक एन. एस. कदम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कदम, पोलीस नाईक शिवाजी भिसे, पोलीस कॉन्स्टेबल धीरज कुंभार, अभय साबळे, गणेश घाडगे, विशाल धुमाळ, गणेश भोंग, संतोष कचरे यांनी सहभाग घेतला.