Your Own Digital Platform

खंडाळ्यातील एशियन पेंट कंपनीच्या कामगारांवर अन्याय : रिपाई जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांची ठेकेदाराच्या विरोधात तक्रार


स्थैर्य, सातारा : शिरवळ, ता. येथील खंडाळा येथील एशियन पेंटस् कंपनीमध्ये माथाडी कामगारांकडून तब्बल 16 टन ओझे वाहून नेण्याचे काम करून घेतले जात आहे. परंतु, त्यांना मोबदला कमी अन् कॉन्ट्रॅक्टरला मात्र, प्रत्येकामागे 1900 रुपये कमिशन मिळत आहे. या अन्यायाविरोधात कामगारांनी केलेल्या आंदोलनाची जिल्हाधिकारी यांनी दखल घेवून कारवाई करावी, अशी मागणी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक अशोक गायकवाड यांनी केली आहे.

सातारा येथील सर्किट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी गायकवाड म्हणाले, एशियन पेंट कंपनीमध्ये सध्या कामगारांचे आंदोलन सुरू आहे. या कामगारांना पगार कामगार आयुक्तालय कार्यालयाद्वारे मिळावा, कंपनीने कोणताही कामगार पुरवणारा ठेकेदार नेमू नये, अशी मागणी कामगारांनी केली आहे. वास्तविक, कंपनी ठेकेदाराला प्रति टनाप्रमाणे 150 रुपये देते. ठेकेदार कामगारांकडून 12 तासांमध्ये 16 टनाचे ओझे वाहून नेण्याचे काम करून घेतात व 500 ते 600 रुपये देतात. यापेक्षा कमी काम झाले तर त्यांची गैरहजेरी मांडली जाते. 16 टनाचे 2400 रुपये होत असले तरी कामगारांना केवळ 500 ते 600 रुपये तर उर्वरित 1900 रुपये कोणतेही कष्ट न करता ठेकेदार मिळवतो, असा आरोप गायकवाड यांनी केला.
 
या कंपनीमध्ये 37 नोंदणीकृत माथाडी कामगार आहेत. त्यांच्यावर अन्याय करून कंपनी अनोंदणीकृत कामगारांना बोलावून काम करून घेते. त्यावर बंदी घालावी व 37 नोंदणीकृत कामगारांना सामावून घ्यावे, अशी या कामगारांची मागणी आहे. नोंदणीकृत कामगार न घेतल्याने शासनाचा लेव्ही धोक्यात आला आहे. गेली 5 ते सहा वर्षे ही कंपनी संबंधित 37 लोकांची नोंदणी दाखवते व तेवढाच लेव्ही देते. मात्र, ठेकेदारामार्फत नोंदणीकृत नसलेल्या कामगारांकडून काम करून घेतले जात असल्याने हा 33 टक्के लेव्ही बुडत आहे. शिवाय भुमिपुत्रांवरही अन्याय होत आहे. याबाबत मी आयुक्तालयांकडे विचारणा केली होती. मात्र, त्यांनाही कंपनीच्या गेटमधून आत जावू दिले नाही. यामुळे जिल्हाधिकारी यांनी याप्रश्‍नी लक्ष घालून संबंधित कंपनीवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा करण्याचा इशारा अशोक गायकवाड यांनी दिला आहे.