Your Own Digital Platform


भीषण आगीत सुमारे ३० लाख रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान 

आसू दि. २ : शिंदेनगर (आसू), ता. फलटण येथील सुमारे १५ एकर क्षेत्रातील उभा ऊस वीज वाहक तारा तुटून ऊसाच्या पिकात पडल्याने लागलेल्या भीषण आगीत ८/९ शेतकऱ्यांचे सुमारे ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून तशी नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.

विलास गुलाबराव शिंदे, रा. शिंदेनगर, ता. फलटण यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीनुसार, आज रविवार दि. २ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ते घरी असताना त्यांना दूरध्वनीद्वारे नीरा उजवा कालवा ३४ मायनर असलेल्या माझ्या क्षेत्राचे शेजारी धनाजी शंकरराव भगत यांचे क्षेत्रातील उभे ऊसाचे पिकावर शेजारचे खांबावरील ३ वीज वाहक तारा तुटून पडल्याने त्यांचे ऊसाने पेट घेतला, त्यानंतर लगत असलेल्या आपल्या तसेच विलास शिंदे, धनाजी भगत, विजय भगत, विलास धुमाळ, सतीश शिंदे, रंगनाथ फुले, सागर भगत, रामदास फुले, मोहन फुले वगैरे अनेक शेतकऱ्यांच्या उभ्या ऊसापर्यंत आग पोहोचल्याने या सुमारे १५ एकरातील ऊस जळून खाक झाला असून या शेतकऱ्यांचे सुमारे ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे खबरी मध्ये नमूद करण्यात आले आहे.

याबाबत चौकशी होऊन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.