Your Own Digital Platform

सातारा सैनिक स्कूलचे प्रवेशद्वार पालकांनी रोखले


प्रवेश परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा संशय : पालकांशी चर्चा करण्यास प्रशासनाचा नकार

 
स्थैर्य, सातारा : सातारा सैनिक स्कूलच्या प्रवेश परीक्षेच्या गुणांकनात फरक पडल्याचा आरोप करत परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शुक्रवारी दुपारी सातारा सैनिक स्कूलच्या प्रवेशद्वाराचा मार्ग रोखला . मात्र प्रशासनाने पालकांशी कोणतीही चर्चा करण्यास नकार दिल्याने पालकांना दिवसभर ताटकळावे लागले.

सातारा सैनिक स्कूलची प्रवेश परीक्षा पंधरवड्यापूर्वी एका एजन्सीच्या माध्यमातून घेण्यात आली होती . या प्रवेश परीक्षेचा निकाल गुरूवारी सायंकाळी जाहीर झाला मात्र सराव सत्राचे विद्यार्थ्यांचे गुणांकन व प्रत्यक्ष प्रवेश परीक्षेचे गुणांकन यात बरीच तफावत आल्याने सकाळी अकरा वाजल्यापासून सैनिक स्कूलच्या प्रवेशद्वारावर गर्दी व्हायला सुरवात झाली होती . मात्र प्रशासाने चर्चेस थेट नकार देत शाळेचे मुख्य प्रवेशद्वार लावून घेतले . शाळा प्राचार्य मिश्रा यांच्याशी पालकांनी चर्चा केली त्यावेळी ही परीक्षा राज्यस्तरावरून एका एजन्सीच्या वतीने घेण्यात आल्याने यामध्ये शाळेचा काही संबंध नसल्याचे त्यांनी सांगत काही पालकांना माघारी पाठवले . दुपारनंतर शाळा प्रवेशद्वारावर पालकांची गर्दी वाढू लागली . मात्र प्रशासनाच्या सूत्रांनी या पालकांशी चर्चा करण्यास नकार दिला . मुख्याध्यापिका मिश्रा मॅडम सुध्दा पुन्हा फिरकल्या नाहीत . काही संतप्त पालकांनी गेट रोखल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते . मात्र अनुचित कोणताही प्रकार घडला नाही.

सातारा सैनिक स्कूलच्या प्रवेश प्रक्रिया परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा पालकांचा संशय आहे . आपल्या पाल्याचा प्रवेश सुकर करायचा असेल तर ठराविक खात्यात पैसे भरा असे सांगणारे काही फोन पालकांना गेल्याने प्रत्यक्ष प्रवेश परीक्षेच्या प्रक्रियेवर संशयांचे ढग जमा झाले आहेत . फोन करणारी व्यक्ती हिंदीतून बोलत पालकांना पंधरा हजार रुपयांची मागणी करते . या कॉलचे रेकॉर्डिंग सुध्दा पालकांनी ठेवल्याने परिक्षेत काहीतरी गैरप्रकार घडल्याच्या शक्यतांना पुष्टी मिळत आहे .